फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी. व्होकचे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यास एआयसिटीईची (AICET) मान्यता
फलटण - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण येथे डेटा सायन्स, इंटेरिअर डिझाइनिंग, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांना (बी.व्होक.) ए. आय. सी. टी. ई. (AICET) ने मान्यता दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी संलग्नित या कोर्सेस साठी यावर्षी पासून महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
बी. व्होक. डिग्री शासन मान्यता प्राप्त आहे व यूजीसीने देऊ केलेल्या इतर पदवी डिग्रीच्या समतुल्य आहे. या पदवीचे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षा देऊ शकतात किंवा प्रवेशासाठी पदव्युत्तर कोणत्याही कोर्सची निवड करु शकतात. जेथे पदवी ही पात्रता आवश्यक आहे त्या ठिकाणी या अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी पात्र ठरत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
शैक्षणिक पदवीच्या विपरीत व्यवसायिक अभ्यासक्रम पदवी अनुभवात्मक शिक्षणावर आधारित आहेत. पदवी अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे निर्मित केले जातात तर व्यवसायिक शिक्षण पदवी विद्यापीठ अनुदान आयोग तसेच कौशल्य परिषदेशी संलग्नित असतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी संकल्पनांच्या व्यावहारिक वापराविषयी अवगत असतात व त्या विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानाची माहिती अधिक असल्याचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी सांगितले.
महाविद्यालयास सदर कोर्स साठी मान्यता मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती व फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीची सर्वोत्तम शिक्षण देण्याची परंपरा सुरु ठेवण्यासाठी संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. संस्था नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, हेमंत रानडे, शिरिष दोशी, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, अरविंद शहा (वडुजकर), प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, अधिक्षक श्रीकांत फडतरे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणत्याही शाखेचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या कोर्स साठी प्रवेशास पात्र ठरतात. ३ वर्षे कालावधीचे हे व्यवसायिक अभ्यासक्रम आहेत. पदवी कोर्स साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात समक्ष भेटून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद नातू यांनी केले आहे.
No comments