Mirabai Chanu won silver Medal in weightlifting
भारताची आघाडीची वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu) ऑलम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावत भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. तिच्या या कामगिरीने वेटलिफ्टिंग मधील 21 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. यापूर्वी 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. ऑलम्पिकमध्ये सिल्वर जिंकणारी मीराबाई ही बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. तिच्या या रजत कामगिरीचं सर्व भारतातून कौैतुक होत आहे.
मूळची मनिपूर राज्यातील असणारी मीराबाई हिचे संपूर्ण नाव साइखोम मीराबाई चानू असं आहे. लहानपणापासूनच तिला तिरंदाजीमध्ये करिअर करायचं होतं, पण आठव्या इयत्तेत असताना तिने वेटलिफ्टिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. इम्फाळची वेटलिफ्टर कुंजराणीला पाहून आपणही वेटलिफ्टर व्हावं, अशी इच्छा मीराबाईला झाली. त्यांनतर तिने वेटलिफ्टिंग सुरू केले. 2014 च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाईने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते.
2017 च्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाईने सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला होता. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले होते. तिच्या या कामगिरीबद्दल भारत सरकार कडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं. 2018 मध्ये तिला क्रीडा विभागातून पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
49 किलोग्राम महिला वर्गात मीराबाई चानूने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क राउंडमध्ये मिळून तब्बल 202 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं आहे. मीराबाईने स्नॅच राउंडमध्ये 87 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलत हे यश मिळवलं. मीराबाई चानूच्या या रजत कामगिरीच्या तिला रजत शुभेच्छा!
- अॅड. रोहित अहिवळे, फलटण
No comments