Breaking News

मनमिळावू स्वभावाच्या, सर्वाना आपलेसे वाटणार्‍या ज्ञानदेव होले यांची उणीव जाणवणार - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

डी. के. होले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
Retirement felicitation of Headpun D.K. Hole of Agricultural Produce Market Committee

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हेडप्यून होले यांचा सेवानिवृत्ती निमित्त  सत्कार

     फलटण  : शांत, संयमी व अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, कधीही कोणत्याही कामाला नकार न देणारे, सर्वाना आपलेसे वाटणारे ज्ञानदेव होले  निवृत्त होत असताना त्यांच्या कामाची उणीव कोणीही भरुन काढू शकणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
       कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटणच्या मुख्य कार्यालयातील हेडप्यून (नाईक) डी. के. होले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार आणि त्यांच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी व इतर सर्व देय रक्कमा सेवानिवृत्ती दिवशी एकत्रित प्रदान करण्याच्या समारंभात अध्यक्षस्थानावरुन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी बाजार समितीचे माजी चेअरमन विद्यमान संचालक, पंचायत समिती सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर,  व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, बाजार समिती संचालक, मोहनराव निंबाळकर, समर जाधव,  प्रकाश भोंगळे, संजय कदम, चांगदेव खरात, परशुराम फरांदे, विजयकुमार शेडगे, प्रकाश धाइंजे, आरोग्य समिती सदस्य मोहनराव डांगे, पराग भोईटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
      ज्ञानदेव होले यांनी बाजार समिती मध्ये १९७८ ते २०२१ अखेर ४२ वर्षे उत्तम सेवा करणारे ते एकमेव कर्मचारी आहेत. बाजार समितीचे माजी चेअरमन स्व. नामदेवराव जाधव यांचेपासून ते आजअखेर आपल्या सोबत त्यांनी चांगले काम केले असल्याचे नमूद करीत बाजार समिती त्यांना मुदतवाढ देवून आणखी काही दिवस आमच्या सोबत काम करण्याची संधी देईल त्यांनी त्याचा स्वीकार करावा असे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
      आपण ज्यावेळी ऑफिस मधील काम आटोपून परत बाहेर पडायचो त्यावेळी होले यांना जावू का साहेब असे आवर्जून विचारुन मगच बाहेर पडायचो, त्याचे कारण कर्मचारी हा कायम असतो तर पदाधिकारी पाच वर्षासाठी असतो, हे स्पष्ट करीत श्रीमंत शिवरुपराजे यांनी कर्मचाऱ्यां  प्रति असलेले प्रेम व्यक्त केले.
       अरविंद मेहता यांनी ज्ञानदेव होले यांच्या कुटुंबाशी असलेले ऋणानुबंधाची व होले यांच्या कामाची सविस्तर माहिती देत अत्यंत प्रामाणिक, निष्ठावंत कर्मचारी म्हणून काम करताना होले यांनी अनेक दिग्गज नेते बाजार समितीच्या माध्यमातून संपर्कात आले तरी त्याचा कधीही गैरफायदा न घेता उत्तम सेवा बजावल्याचे स्पष्ट करताना बाजार समितीने केवळ शेतमालाची खरेदी विक्री हा मर्यादित हेतू न ठेवता अलीकडे श्रीमंत रघुनाथराजे यांचे नेतृत्वाखाली शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवून बाजार समिती अधिक शेतकरीभिमुख करण्याला प्राधान्य दिल्याने बाजार समितीच्या नावलौकिकात भर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. बाजार समितीच्या शेतकरी हितास्तव कामकाजाचा समग्र आढावा घेत ज्ञानदेव होले यांना सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
     ज्ञानदेव होले यांना प्रा. फंड, ग्रॅच्युईटी व इतर सर्व देय असणारी रक्कम निवृत्ती दिवशी श्रीमंत रघुनाथराजे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याबद्दल बाजार समिती प्रशासनाचे विशेष कौतुक करीत बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकरव त्यांच्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकरी व बाजार समिती हिताला प्राधान्य देवून चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाला साथ केल्याने गेल्या काही वर्षांपासून शासन, प्रशासन व शेतकरी स्तरावर 
बाजार समिती कडे एक आदर्श संस्था म्हणून पाहिले जात असल्याचे अरविंद मेहता यांनी निदर्शनास आणून दिले.
    संचालक प्रकाश भोंगळे, राज्य माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ननावरे यांची समयोचित भाषणे झाली.
  कार्यक्रमास ज्ञानदेव होले यांचे कुटुंबीय, नातेवाईक, बाजार समितीचे सर्व कर्मचारी, बाजार समितीचे परवानाधारक अडते, हमाल, मापाडी, पत्रकार व इतर घटक उपस्थीत होते. 
    प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेत राबविण्यात येत असलेल्या शेतकरी हिताच्या विविध योजना, उपक्रमांविषयी सविस्तर विवेचन केले. संचालक मोहनराव निंबाळकर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.

No comments