संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पादुकांचे फलटण तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत
फलटण तालुक्याच्या सीमेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पादुकांचे स्वागत करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार |
फलटण दि. १९ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी व पादुकांचे फलटण तालुक्याच्या सीमेवर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्यावतीने यथोचित स्वागत केले, तर शहर व तालुक्यातील अबालवृद्ध नागरिक, भाविक, वारकरी यांनी मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहुन माऊली माऊली च्या जयघोषात पान फुले माऊलींच्या वाहनांच्या (एस. टी. बस) दिशेने उधळून मोठ्या उत्साहात स्वागत केले.
माऊलींच्या पादुका व पालखी घेऊन जाण्याची जबाबदारी प्रशासन, आळंदी संस्थान, वारकरी, दिंडीकरी यांनी संयुक्तपणे स्वीकारली असून इंन्सीडंट कमांडर तथा खेड उपविभागाचे प्रांताधिकारी विक्रम चव्हाण, आळंदी संस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. अभय टिळक, विश्वस्त व सोहळा प्रमुख अड. विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश वसंतराव देसाई, विश्वस्त लक्ष्मीकांत वसंतराव देशमुख, हैबतबाबा वंशज प्रतिनिधी राजेंद्र बाळासाहेब पवार, उर्जितसिंह शितोळे सरकार, दिनेश कृष्णराव रंधवे चोपदार, योगीराज मारुती कुऱ्हाडे पाटील चवरीवाले, सौरभ श्रीकांत चौधरी श्रींचे शिपाई, योगेश मोरेश्वर आ अब्दागिरी, अमित नंदकुमार हेंद्रे पंखा मानकरी वाल्हेकर, राहुल अरविंद जोशी पुजारी, बल्लाळेश्वर भीमाशंकर वाघमारे कर्णेकरी यांच्या सह विविध दिंड्यांचे प्रतिनिधी असे ४० विश्वस्त, मानकरी वगैरे मान्यवर माऊली सोबत रथात (एस. टी. बस) आहेत.
सकाळच्या न्याहरीसाठी सोहोळा सुरवडी येथील रॉयल पॅलेस मंगल कार्यालयात विसावला तेथे प्रशासनाच्या वतीने सकाळपासून निघालेल्या सर्वांना फ्रेश होऊन चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती, तो घेऊन सोहोळा फलटण मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरागत पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर जाऊ शकत नसल्याने गतवर्षीपासून राज्यातील १० मुख्य पालख्या एस. टी. बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. यावर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चल पादुका व पालखी शिवशाही बसने नेण्याची जबाबदारी एस. टी. च्या शिवाजीनगर, पुणे आगारावर सोपविण्यात आली आहे. पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर आगार वरिष्ठ आगार व्यवस्थापक अनिल भिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माऊलींसाठी दोन शिवशाही बसेस तांत्रिक व सुशोभित केल्या असून एक जादा बस सोबत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मार्गात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे, तरीही गरज वाटल्यास यांत्रिक विभागाचे एक पथक आणि आवश्यक यंत्र सामुग्री सुटे भाग सोबत देण्यात आल्याने माऊली निर्धारित वेळेत वाखरी व पंढरपूर येथे पोहोचेल असा विश्वास एस. टी. प्रशासनाने व्यक्त केला आहे.
फलटणचे उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे लोणंद, फलटण शहर व तालुका पोलीस ठाण्याचे सहकारी पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्ताद्वारे कोठेही गर्दीमुळे अडथळा येणार नाही यासह कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नियोजनाची चाचणी घेण्यासाठी काल रविवारी पाडेगाव ते धर्मपुरी या मार्गावर प्रतिकात्मक पालखी बस नेऊन खास चाचणी घेण्यात आली, रस्त्यावर नियुक्त पोलीस बंदोबस्त आणि बंदोबस्तात मार्गस्थ झालेली वाहने पाहिल्यानंतर अनेकांना कालच माऊलींचे आगमन झाल्याचे जाणवले.
No comments