११ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण व आराखडे ; अंदाजपत्रके तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न
सरडे येथे सर्वेक्षण सुरु करताना मान्यवर व ग्रामस्थ |
फलटण : केंद्र शासनाच्या जीवन मिशन योजनेंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत दररोज दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यानुसार महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात फलटण तालुक्यातील ११ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके, आराखडे तयार करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पूर्ण करण्यात येणाऱ्या सदर ११ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांपैकी धुळदेव, सरडे, सोमंथळी येथील या योजनांच्या सर्वेक्षण कामास मे. प्रायमुव्ह पुणे, मे. शहा टेक्निकल मुंबई आणि निसर्ग कन्सल्टंशी नाशिक यांनी प्रत्यक्ष सुरुवात केली असून या तीन गावात सर्वेक्षणाचा शुभारंभ आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता सतीश आग्रवाल, डी. पी. संत, शाखा अभियंता एस. एस. शिंदे आणि फलटण तालुका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेचे कुलकर्णी, सय्यद, समिद शेख व त्यांचे सहकारी तसेच संबंधीत गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व अन्य संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
धुळदेव येथील कार्यक्रमात बोलताना आ. दिपकराव चव्हाण, व्यासपीठावर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती शंकरराव माडकर व अन्य मान्यवर |
ज्या योजनांच्या कामासाठी अंदाजे ५ कोटी पेक्षा अधिक खर्च अपेक्षीत आहे, अशा योजनांचा समावेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कृती आराखड्यात करण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील सोमंथळी, सरडे, ठाकुरकी, फरांदवाडी, धुळदेव, अलगुडेवाडी, वाठार निंबाळकर, जिंती, चौधरवाडी, पिंप्रद, होळ, खामगाव या गावातील प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनांचे सर्वेक्षण, संकल्पन, सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे तयार करुन योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे. सदर योजनांच्या सर्वेक्षण शुभारंभ झाला असून आगामी २ महिन्यात सदर योजनांचे प्रकल्प अहवाल तयार होतील अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
पुरेशा मनुष्यबळा अभावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सदर योजनांच्या अंमलबजावणीबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत आणि योजनांची कामे वेळेत व दर्जेदार व्हावीत यासाठी फलटण तालुका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेची नियुक्ती करण्यात आली असून त्यानुसार मे. निसर्ग कन्सल्टंशी नाशिक, मे. प्रायमुव्ह पुणे आणि मे. शहा टेक्निकल मुंबई यांच्या कडे या योजनांचे प्रा. सर्वेक्षण अहवाल तयार करणे, सर्वेक्षण, सविस्तर अंदाजपत्रके व आराखडे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सोमंथळी येथे सर्वेक्षण सुरु करताना मान्यवर व ग्रामस्थ. |
सदर योजनांपैकी बहुतांश गावे नीरा उजवा कालव्या लगत असल्याने जल उदभव नीरा उजवा कालवा आहे, त्यामुळे कालव्या लगत पाटबंधारे खात्याच्या जागेत त्यांची रीतसर परवानगी घेऊन विहीर, साठवण तलाव, जलशुद्धीकरण यंत्रणांची उभारणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फलटण तालुका प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेच्या नियंत्रणाखाली आणि नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सी मार्फत सर्वेक्षण, अंदाजपत्रके, आराखडे बिनचूक व वेगाने आगामी २ महिन्यात पूर्ण करुन शासनास सदर योजना अंतीम मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा मार्फत सादर करण्यात येतील असे मजीप्राचे उप अभियंता सतीश आग्रवाल यांनी सांगितले.
या कार्यक्रमांना धुळदेव येथे उपसरपंच व्यंकटराव दड्स, राजाराम तांबे, परशुराम फरांदे, माजी सरपंच सुभाष शिंदे, चंद्रकांत जाधव, गजानन धर्माधिकारी, अलगुडेवाडी डॉ. चंद्रकांत निकम, मनोहर कुदळे, सरपंच मंगलाताई शिंदे, सरडे येथे सुखदेव बेलदार, सुरेश बेलदार, सरपंच पूनम मारुती चव्हाण, कांतीलाल बेलदार, सोमंथळी येथे संजय सोडमिसे, दत्तात्रय सोडमिसे, सरपंच जगुबाई सोडमिसे, कीसनराव शिपकुले, माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, हणमंतराव सोडमिसे, सोसायटी चेअरमन हरिभाऊ बोडरे, अशोक भापकर, किरण सोडमिसे.
No comments