संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १९ - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा आज सोमवारी दुपारी पालखी मार्गावरून शिवशाही बसने पंढरपूर कडे मार्गस्थ झाला असताना, क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथे शहर व तालुक्यातील ग्रामस्थ, महिला वारकरी भाविक यांनी माउलींचा जयघोष करुन, पालखी सोहळ्याचे स्वागत केले व दर्शन घेतले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्त होताना |
आज राज्यातील दहा मानाच्या पालख्यांनी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याने सकाळी आळंदी येथून प्रस्थान केल्यानंतर आज दिनांक 19 जुलै रोजी दुपारी फलटण येथून पुढे मार्गस्थ झाला त्यावेळी भाविकांनी पुणे पंढरपूर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती, माउलींच्या जयघोषात पालखी सोहळ्याचे फलटणकरांनी स्वागत केले तर शिवशाही बसला हात लावून बऱ्याच भाविकांनी दर्शन घेतले.
शिवशाही एस. टी. बसला फुलांच्या साह्याने सजवून पालखी रथ तयार करण्यात आला होता, त्यामध्ये खास व्यवस्था करुन त्यावर फुले फळांच्या मध्ये रेशमी वस्त्रावर माऊलींच्या पादुका विराजमान करण्यात आल्या. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येण्यापूर्वी तरडगाव येथे चांदोबाचा लिंब येथे भाविकांनी दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती, त्यानंतर निभोरे, काळज, सुरवडी, वडजल वगैरे परंपरागत ठिकाणी भाविकांनी दुतर्फा उभा राहुन पंढरपूरकडे निघालेल्या माऊलींचे दर्शन घेतले.
No comments