शेकडो घरात प्रकाश पेरायला कारणीभूत झालेल्या कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी केले कौतुक
सातारा (जिमाका) : सातारा जिल्ह्यात दि. 21 ते 24 जुलै 2021 या दरम्यानच्या काळात अतिवृष्टीमुळे कोयना नदीला आलेल्या महापूरात ख्ंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करुन शेकडो घरात प्रकाश पेरायला कारणीभूत ठरलेल्या सातारा मंडलातील कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना, वेण्णा, मोरणा, वांग या प्रमुख नद्यांसह इतर छोटया मोठया नद्यांना व नाल्यांना आलेल्या महापूरामुळे व भूस्खलनामुळे ३३ केव्ही ची मारळी उपकेंद्र कडे जाणाऱ्या लाईनच्या तारा नदी च्या पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित केला गेला होता. 7 उपकेंद्रे, 65 विद्युत वाहिन्या, 2050 रोहित्रे व जवळपास 2 हजाराच्या वर पोल पडल्यामुळे 426 गावांमधील 80 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. तसेच दरडी कोसळल्याने रस्ते बंद होते व नद्यांना पूर आल्याने पूल वाहून गेले असल्याने पाण्याची पातळी कमी झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु पूरामुळे वाहून आलेल्या झाडांच्या फांद्यामुळे तारांना पीळ पडला व तारा एकमेकांत अडकल्याने वीजपुरवठा सुरळीत करता येत नव्हता. दोन दिवस प्रयत्न करून ही यश येत नव्हते. परंतु एक कर्मचारी धाडस करून, ताराला झूला बांधून लोंबकळत गेला आणि तारांना अडकलेल्या झाडांच्या फांद्या काढून तारा एकमेकां पासून वेगळ्या केल्या आणि वीजपुरवठा सुरळीत केला गेला.
सातारा मंडलांतर्गत सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंते, शाखाधिकारी, जनमित्र, ठेकेदार व त्यांचे कर्मचारी यांचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कौतुक केले.
No comments