Breaking News

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Financial assistance of Rs. 5,000 each to 56,000 artists in the state - Chief Minister Uddhav Thackeray

राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा

    मुंबई  : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर कलाकारांसाठी एकरकमी कोविड दिलासा अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील यासंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची बैठक झाली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाकडील विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, श्री सिद्धिविनायक मंदिर संस्थानचे अध्यक्ष आदेश बांदेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपथित होते.

    गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोविड संसर्गाशी लढा देत आहे. राज्यातील कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत

    राज्यात सध्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास 8 हजार कलाकार असून राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. या सर्व कलाकारांना प्रती कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे.

समूह लोककलापथकांचे चालक-मालक आणि निर्माते यांनाही एकरकमी विशेष कोविड अनुदान

    राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कलापथके कार्यरत आहेत. कोविडमुळे वर्षभरात प्रयोग न  झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे असून शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड- हंगामी,दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधीनाट्य, सर्कस आणि टुरींग टॉकीज अशा जवळपास 847 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून यासाठी 6 कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण, कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी 1 कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीदरम्यान सांस्कृतिक कार्य विभागाचे सादरीकरणही करण्यात आले.

No comments