भारतीय हॉकी संघास ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 5 ऑगस्ट 2021 - भारतीय हॉकी संघाने जर्मनी हॉकी संघाचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला आहे. भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये १९८० साली अखेरचे पदक जिंकले होते. तेव्हा मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते.
आज झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीत जर्मनीने दुसऱ्या मिनिटाला गोल करून चांगली सुरूवात केली. पहिल्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा जर्मनीने भारतावर १-० अशी आघाडी घेतली होती. या क्वॉर्टरच्या अखेरच्या काही मिनिटात जर्मनीला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय हॉकी संघाने त्यांना गोल करू दिला नाही.
दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय हॉकी संघाने सुरुवातीच्या काही मिनिटात गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. परंतु जर्मनी हॉकी संघाने एकापाठोपाठ एक असे गोल करून भारतावर ३-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. भारत ही लढत हरतोय की काय असे वाटत असतानाच पहिला हाफ संपण्याच्या आधी भारतीय हॉकी संघाने एका पाठोपाठ एक गोल करत सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली.
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये रुपिंदर पाल सिंहने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करून भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिमरनजीतने भारतासाठी आणखी एक गोल करून ५-३ अशी आघाडी केली. तिसऱ्या क्वॉर्टरचा खेळ संपला तेव्हा भारताने आघाडी कायम ठेवली होती. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताने आघाडी कामय ठेवली. अखेरच्या ४ मिनिटात जर्मनीने गोलकीपरला बाहेर केले आणि गोल करण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. शेवटच्या मिनिटाला देखील जर्मनीला गोल करण्याची संधी होती. पण भारताने त्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही आणि ऐतिहासिक असे पदक जिंकून दिले.
No comments