Breaking News

जिल्ह्यातील विकास कामे करताना स्थानिक संस्कृती व परंपरांचे जतन करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Local culture and traditions must be preserved while carrying out development works in the district - Chief Minister Uddhav Thackeray

    पालघर, दि. 19 :- जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिकस्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विकास कामे करताना आदिवासी संस्कृती व परंपरा यांचे जतन करून विकास कामे करावीत व नवीन इमारतीचा नावलौकिक वाढवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
नवीन सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

    यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ऑनलाईन उपस्थित होते. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल व ग्रामविकास मंत्री अब्दूल सत्तार, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावीत, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, रवींद्र पाठक, मुख्य सचिव सिताराम कुंटे(ऑनलाईन पद्धतीने), कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, कोकण परिक्षेत्र उपमहानिरिक्षक संजय मोहिते, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    जिल्ह्याला सागरी, नागरी आणि डोंगरी भौगोलिक भूभाग लाभला असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो. तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामाकरून नुकसानग्रस्ताना मदत वाटपाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सीजन प्रकल्प उभारला आहे. ऑक्सीजनबाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

    पालघर जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला व परंपरेला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे जिल्ह्यामध्ये वनसंपदा आहे औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ चिकु साता समुद्रापार गेले आहे. वारली चित्रकला हे सर्व परंपरेने लाभलेले महत्त्वाचे घटक आहेत. या सर्व घटकांना गती देऊन जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी. जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील उद्योग वाढावेत यासाठी उद्योजकांना विविध सवलती देऊन गुंतवणुक करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा प्रशासनामार्फत पालघर जिल्ह्यात एकूण 13 शिवभोजन केंद्र मंजूर असून त्यापैकी सद्यस्थितीत 9 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. सदर शिवभोजन केंद्रातून सध्या प्रतिदिन 3 हजार थाळी मोफत शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत आजपर्यंत 9 लाख 10 हजार 771 थाळ्यांचा लाभ लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. या योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

    पावसाची परिस्थिती असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रात गेलेले मच्छिमार यांना परत समुद्र किनारी असल्याने जिल्हा प्रशासनाच्या या कार्यतत्परतेमुळे जीवित हानी टाळता आली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या काळात नवीन इमारतीचे लोकार्पण होत आहे. ही बाब अभिमानास्पद असून नवीन इमारतीत येणाऱ्या नागरिकांचे काम तात्काळ होतील अशी दृढ इच्छा आपण मनामध्ये बाळगली तर ही भव्य सुसज्ज इमारत देशामध्ये आगळी वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले की, नवीन वास्तुमध्ये काम करताना नागरिकांच्या गरजांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. नवीन वास्तू जनतेच्या सेवेसाठी असल्याने अधिकारी व नागरिकांमधील बांधिलकी टिकणे महत्त्वाचे आहे. जव्हार येथिल राजवाड्याच्या कलाकृतीवरून सिडकोने निर्माण केलेल्या जिल्हा प्रशासनाची कलात्मक स्थापत्याचा अनोखा अविष्कार असलेली अशी भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. अशी शासकीय कार्यालयाची वास्तू संपूर्ण देशात नाही. या वास्तूमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाज घटकांना समान न्याय देऊन जिल्ह्याचा विकास साधावा. या वास्तूमुळे जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळेल असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला.

    कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जिल्ह्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याने विकासाच्या नवीन पर्वाला सुरूवात झाली आहे.

    प्रशासकीय इमारतींमध्ये साधारणत: 60 जिल्हास्तरीय कार्यालये स्थापीत होणार आहेत. आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 41 शासकीय कार्यालये स्थापन झाली असून, उर्वरित 23 विभागांची कार्यालये लवकर स्थापन होणे आवश्यक आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आदिवासी विकास भवन, महिलांसाठी ‘One Stop Centre’ यांचेकरीता जागा उपलब्ध करून देवून सदरहू इमारतींचे बांधकाम येत्या 2 वर्षांमध्ये पूर्णकरण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

    याचबरोबर मौजे टेंभोडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागास 2 एकर जागा देण्यात आली आहे. मौजे सरावली येथे सुसज्य ग्रामीण रूग्णालय बांधण्याकरिता 1.5 एक्कर जागा प्रदान करण्यात आली आहे. JSW कंपनी CSR निधीमधून यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून देणार आहे. मौजे उमरोळी येथे जिल्हाकारागृहासाठी 25 एकर जागा, ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रास (RSETI) 2 एकर जागा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयास 5 हेक्टर (12.50 एक्कर) जागा प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये “स्त्री रुग्णालय” स्थापन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 5 एक्कर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

    स्थानिक खेडाळूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी मौजे टेंभोडे येथे 16 एक्कर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडासंकुल विकसित करण्यात येत आहे. मौजे अल्याळी येथे 4 एक्कर जागा क्रिडांगणाकरिता पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. मौजे अल्याळी, नवली, टेंभोडे येथील तलाव व पालघर शहरातील गणेश कुंड बगीचा क्षेत्र विकास करण्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्ती मृत्यू व 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. 14 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके/ फळपिकांचे नुकसान झालेले आहे. 95 घरांचे पूर्णत: तर 14 हजार 312 घरांचे अशंत: पडझड होऊन नुकसान झालेले आहे. तसेच 53 बोटींचे नुकसान झाले असून, सदर नुकसानीसाठी शासनाकडून विशेष दराने मदत जाहिरकरून जिल्ह्याला 51 कोटी 51 लाख इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभारही पालकमंत्री दादाजी भूसे यांनी यावेळी व्यक्त केले.

No comments