फलटणच्या सुकन्या व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना राज्यपालांच्या हस्ते कोविड संजीवन पुरस्कार प्रदान
अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना कोविड संजीवन पुरस्कार प्रदान करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी |
फलटण (प्रतिनिधी) - कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल फलटणच्या सुकन्या आणि सध्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोविड संजीवनी पुरस्कार राजभवनात देण्यात आला.
महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून कोविड संजीवनी पुरस्कार हा कोविड मध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याला दिला जात आहे. हा पुरस्कार देताना अधिकाऱ्यांनी राबवलेल्या उपायोजना त्याचा झालेला परिणाम याचा बारकाईने अभ्यास केला जातो. या वर्षीचा हा पुरस्कार मूळच्या फलटणच्या आणि सध्या मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त असणाऱ्या सुजाता दिलीपराव ढोले यांना देण्यात आला.
सुजाता ढोले यांनी, मार्च 2020 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका मध्ये अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली होती. नंतर कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, कोरोनाचे आव्हान स्वीकारून त्यांनी काम सुरू केले. नवी मुंबईच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता संसर्ग रोखणे खूप अवघड होऊन बसलेले असतानाच सुजाता ढोले यांनी अनेक नवीन उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अविरत काम करत एकही दिवस सुट्टी न घेता नवी मुंबईतील मृत्यूदर कमालीचा नियंत्रित राखल्याबद्दल शासनाने त्यांचा यथोचित गौरव करत हा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार त्यांना प्रदान केला.
यावेळी बोलताना सुजाता ढोले म्हणाल्या की टेस्टिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या आधारावर नवी मुंबईतील कोरोना आटोक्यात ठेवला. देशातील महापालिकेच्या स्वतःच्या मालकीची व सर्वात कमी कालावधी मध्ये आम्ही पहिली टेस्टिंग लॅब बनवली. तसेच पहिल्या लाटेमध्ये जवळपास दोन लाख मजुरांना रोज महापालिकेतर्फे जेवण दिले गेले. अपंगांना घरपोच किराणा पोहोचवण्याचे काम विविध एनजीओच्या मार्फत महापालिकेने केले. दोन्ही लाटेमध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, पुरेसा औषध साठा तयार ठेवणे, ऑक्सिजनची उपलब्धता करून देणे, आयसोलेशन सेंटर व कोविड सेंटरची वेळोवेळी व्यवस्था ठेवणे या सर्व गोष्टी खरोखरच तारेवरच्या कसरती प्रमाणे होत्या. परंतु आमचे आयुक्त आणि सर्व कर्मचाऱ्यांची टीम यांनी एकदिलाने काम करत कोरोनावर यशस्वी मात केली, याचा सन्मान म्हणून आज मला राज्यपालांकडून हा पुरस्कार मिळत असल्याने आनंद झाला असे सुजाता ढोले यांनी सांगितले.
सुजाता ढोले यांचे पती दिलीपराव ढोले हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, या पुरस्काराबद्दल सुजाता ढोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments