Breaking News

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

Online training to become a tourist guide through the Directorate of Tourism

    मुंबई  - महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही उपलब्ध असून पात्र इच्छूकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.
    यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्व विभागाची सर्व  पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याशी ०२२-६२९४८८१७ या क्रमांकावर किंवा diot@maharashtratourism.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
    केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षित जिल्ह्यांचे अधिवासीत रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.
उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि १८ ते ४० वयोगटातील असावा. उमेदवार ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल तर त्याने किमान दहावी उत्तीर्ण असावे, अशा काही अटी या प्रशिक्षणासाठी आहेत, असे डॉ. सावळकर यांनी सांगितले.

No comments