प्रवीण जाधवच्या घरच्यांना त्रास देणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ४ ऑगस्ट २०२१ - प्रवीण जाधव यांच्या घरच्यांना त्रास दिला जातोय हे मला मीडियातून आज समजले आहे, त्यासंदर्भात मी पोलीस प्रशासनाशी बोललो आहे, ताबडतोब आजच्या आज ॲक्शन घेऊन प्रवीण जाधव यांच्या घरच्यांना त्रास देणाऱ्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल याची मी याठिकाणी खात्री देतो असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. तसेच प्रवीण जाधव हा देशाचा बहुमान असून ताबडतोब या वादातून त्यांना कसे मुक्त करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ असे आश्वासनही दिले.
प्रसारमाध्यमांनी खा. रणजितसिंह यांना प्रवीण जाधव यांच्या घरच्यांना होणार्या त्रासाबद्दल विचारले असता, त्यावर खा. रणजितसिंह बोलत होते. याप्रसंगी माथाडी नेते नरेंद्र पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. रणजितसिंह म्हणाले की, मी मागच्या आठवड्यातच प्रवीण जाधव यांच्या आईवडिलांची भेट घेतली होती, ते फार गरिबीतून आलेले आहेत, त्यांची परिस्थिती हलाखीची आहे, त्यांना घर बांधण्यासाठी जागेचा प्रश्न आम्ही लवकरच निकाली काढू तसेच त्यांच्या कुटुंबास जे आर्थिक सहकार्य लागेल ते आम्ही मतदार संघाचा खासदार म्हणून करू तसेच प्रवीण जाधव सारखे अनेक खेळाडू सातारा जिल्ह्याच्या मातीतून तयार व्हावे यासाठी आम्ही सहकार्य करू असे आश्वासन यावेळी दिले.
प्रवीण जाधव यांच्या घरासंबंधित विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदारांची ते म्हणाले की, त्यांचे घर फॉरेस्ट च्या जागेत असेल तर आम्ही फॉरेस्ट खात्याकडे विनंती करून, ती जागा त्यांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न करू किंवा जास्त क्रिटिकल होत असेल तर त्यांना जागा खरेदी करून उपलब्ध करून देऊ असे आश्वासन खासदार रणजितसिंह यांनी यावेळी दिले.
शेती महामंडळाने दिलेल्या चार गुंठे जागेवर शेजारचा माणूस हक्क सांगत असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर, खा. रणजितसिंह यांनी, प्रवीण जाधव यांचे देशासाठी योगदान किती मोठे आहे ते स्थानिक पातळीवर लोकांना माहीत नाही आणि गावपातळीवर असणारे भाऊबंदकी व इतर वाद हे चालू असतात, परंतु प्रवीण जाधव हा देशाचा बहुमान असून ताबडतोब या वादातून त्यांना कसे मुक्त करता येईल याकडे आम्ही लक्ष देऊ असे आश्वासन दिले.
No comments