Breaking News

मदत एक निमित्त, आम्ही तुमचे दुःख समजावून घेण्यासाठीच आलो आहोत : बंडातात्या कराडकर

युवक मित्र बंडातात्या, तहसीलदार राजेंद्र पोळ, विलासबाबा जवळ व अन्य मान्यवर
We have come to explain your grief: Bandatatya Karadkar
     फलटण  - : महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक  ठिकाणी नुकसान झाले असले व अनेक ठिकाणी पूर आला असला तरीही जावळी तालुक्यातील डोंगर कपारीत व दऱ्या-खोऱ्यात राहणारा शेतकरी या प्रकोपामुळे पुरता उध्वस्त झाला आहे. आपल्या काळ्या आईची सेवा करणारा व याच्यावरच उदर निर्वाह असलेला शेतकरी वर्ग या अस्मानी संकटाने नैराशाच्या गर्तेत अडकला असून यांचे दुःख समजून घेण्यासाठीच आम्ही आलो आहोत. मदत फक्त एक निमित्त असल्याचे प्रतिपादन जेष्ठ कीर्तनकार, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक, संतवीर बंडातात्या कराडकर यांनी वाहिटे ता. जावली येथे बोलताना केले.
     वाहिटे गावातील नुकसानीची पहाणी करण्यात आली. यावेळी जावलीचे तहसिलदार  राजेंद्र पोळ, मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, जावली वारकरी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज शिंदे, विजयमहाराज शेलार, विलासबाबा जवळ, बजरंग चौधरी, राजेंद्र जाधव, दिपक महाराज, नंदु जगताप तसेच महाराष्ट्रातून आलेले व्यसनमुक्त संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक मित्र बंडातात्या यांच्या समवेत आपद्ग्रस्त कुटुंबातील महिला व अन्य मान्यवर.
      यावेळी जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व मदत कार्याची माहिती दिली. आपण पलुस तालुक्यात असताना व्यसनमुक्त युवक संघाने सन २०१९ मध्ये पूरग्रस्त बुर्ली गाव दत्तक घेतल्याचा उल्लेख करुन संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनीही आदरणीय तात्या व  व्यसनमुक्त युवक संघ मदतीसाठी येथे पोहोचल्याबद्दल आभार मानले.
       अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापुर, चिपळूण, महाड, रत्नागिरी या शहरात दरवर्षी प्रमाणेच पुराचे पाणी भरले. पण या वर्षी निसर्गाच्या झालेल्या प्रकोपामुळे
डोंगरी भागात राहणार्‍या शेतकरी वर्गाला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. तळीये (महाड), पाटण, वाई भागात डोंगर खाली येवून काही गावेच उध्वस्त झाली आहेत. यामधे जिवीत हानीही झाली आहे. जावली तालुक्यातही ६ लोक वाहुन गेले असून बोंडारवाडी ते आंबेघर व केळघर ते वाहिटे-रेंगडी या गावातील शेतकर्‍यांची अपरिमीत हानी झाली आहे. संपूर्ण शेतीच उध्वस्त झाली असून गावागावातील विहीरी गाडल्या गेल्या आहेत. शेतीपंपाच्या मोटारी वाहुन गेल्या आहेत. डोंगर तुटून खाली आलेले अजस्त्र दगड मशिनला सुध्दा हलेना झालेत. लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही, संपर्कासाठी मोबाईलला रेंज नाही अशा या डोंगरी भागातील शेतकर्‍यांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी गुरुवर्य बंडातात्या कराडकर व व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते या भागात पोहोचले.
     शेतकर्‍यांना धीर देत बोलत असताना इथली भयानक परस्थिती पाहुन बंडातात्या कराडकर यांच्या अश्रुचा बांध फुटला, हे दुःख इतके मोठे आहे की, तुमचे अश्रु कोणीच पुसू शकत नाही पण तुम्हाला जिद्दिने सावरायलाच हवे व पुन्हा उभे रहायलाच हवे. या भागातील गरिब व गरजू मुलांना राष्ट्रबंधु राजीवजी दिक्षित गुरुकुल, पिंप्रद ता. फलटण येथे मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्विकारत आहोत. वाहिटे, बाहुळे, भूतेघर व बोंडारवाडी या गावात आम्ही मदत दिली असली तरी ही मदत पुरेशी नाही. समाजातील लोकांनी पुढे येवून या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात द्यावा असे आवाहन कराडकर यांनी यावेळी केले.
     या प्रसंगी सर्वच गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी इलेक्ट्रॉनिक मिडीया आमच्या पर्यंत न पोहचल्याने आमच्या नुकसानीची दाहकता व गंभीरता सरकार दरबारी न पोहचल्याची खंत व्यक्त केली. सरकारचा एकही मंत्री या भागात अजून पोहचला नसल्याचे सांगून आमची शेती गाडली गेली पण माणसे  शाबुत असल्यानेच त्यांचे या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

No comments