९ व १० ऑक्टोबरला होणार सीईटी परीक्षा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
CET exam to be held on 9th and 10th October - Higher and Technical Education Minister Uday Samant
मुंबई -: राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या नैसर्गिक आपत्तीमुळे काही विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत अथवा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा पूर्ण करु शकले नाहीत, अशा उमेदवारांनी ई-मेलद्वारे, कार्यालयीन दूरध्वनी, केंद्र प्रमुख भेट आणि स्वत: सीईटी कक्षात येऊन प्रत्यक्ष भेटीदरम्यान परीक्षा देऊ न शकल्याची विविध कारणे सीईटी कक्षाकडे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यामुळे, अतिवृष्टी, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड इ. साथीचे आजार, ट्राफिक, रोड दुर्घटना इत्यादीमुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अडचण, एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे, परीक्षेचे पहिले सत्र 30 मिनिटाच्या आत तांत्रिक अडचण निर्माण होणे, परीक्षेला प्रत्यक्ष हजर असूनसुद्धा तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेचा पूर्ण वेळ न मिळणे अशी कारणे नमूद केली आहेत.
या कारणांचा सहानुभूतीपूर्वक विचार करता तसेच उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता पीसीएम ग्रुप करिता जवळपास 27 ते 30 हजार उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन परीक्षा देऊ शकले नाहीत अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्यासाठी अंतिम संधी देण्यात देण्यात येणार आहे.
श्री.सामंत म्हणाले, वरील कारणांचा विचार करता पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना दि. 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत वरील कारणांना अनुसरुन पात्र उमेदवारांना ईमेल व एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्क यापूर्वी भरली असल्यामुळे त्यांची नि:शुल्क नोंदणी करुन घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्र उपलब्ध करुन देऊन दि. 9 व 10 ऑक्टोबर 2021 रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपची अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालक यांनी काळजी करू नये, असेही आवाहन मंत्री श्री. सामंत यांनी केले.
No comments