Breaking News

कोविड पासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी लस घ्यावी : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Citizens should get vaccinated to protect themselves from covid: Collector Shekhar Singh

    सातारा  (जिमाका) :    लस ही सुरक्षित असून कोविडच्या महासाथी पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लस घ्यावी असे  आवाहन  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

   यूनिसेफ, सीवायडीए पुणे, सातारा जिल्हा प्रशासन व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने, कराड,खटाव व फलटण तालुक्यातील गावात लसीकरणाबाबत असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी  व जनजागृती करण्यासाठीची  विशेष  मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी युनिसेफ महाराष्ट्राचे आनंद घोडके व देविका देशमुख, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे   देविदास ताम्हाणे, सीवायडीए पुणे याचे संचालक प्रवीण जाधव , समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शाली जोसेफ हे उपस्थित होते.

    लसीकरण जनजागृती मोहिम राबवण्यासाठी युनिसेफ सीवायडीए व समाजकार्य महाविद्यालयाचा पुढाकार कौतुकास्पद असल्याचे  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

   या मोहिमेमध्ये कराड तालुक्यातील 112 गावे, खटाव तालुक्यातील 90 व फलटण तालुक्यातील 94 गावे समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे सातारा शहरातील 9 ठिकाणांचा देखील समावेश आहे. या मोहिमेसाठी  आवश्यक असणारे अर्थसाह्य  युनिसेफने केले आहे. या मोहिमेमध्ये समाजकार्य महाविद्यालयाचे एकूण 60 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून समाविष्ट आहेत.

      जुलै 2021 मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई, जावली, महाबळेश्वर व पाटण तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले होते, ज्यामुळे बऱ्याच कुटुंबांची जीवित हानी व वित्तहानी झाली होती. या कुटुंबांना   अत्यावश्यक साहित्याची  मदत करण्यात येणार आहे. यामध्ये   तालुक्यातील जवळपास 4000 व्यक्तींना मदत केली जाणार आहे. यात  घरगुती वापरासाठीची भांडी, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य, शैक्षणिक साहित्य व करमणुकीचे साहित्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्य ३ ते ८ या वयगटासाठी वेगळे व 9 ते 14 या वयोगटातील मुला-मुलींना वेगळे देण्यात येणार आहे.

No comments