गणेशोत्सव मंडळांनी मंडपामध्ये निर्जंतूकीकरण, आग प्रतिबंधक उपाय योजना, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे - मुख्याधिकारी संजय गायकवाड
फलटण दि.११ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव काळात लाऊड स्पीकर चा वापर नियमानुसार करावा, तसेच गणेश मंडपात तात्पुरती आग प्रतिबंधक उपाय योजना करण्यात यावी, मंडपामध्ये निर्जंतूकीकरण, थर्मल स्क्रीनींगची सोय करावी, श्रींच्या आरतीवेळी गर्दी कमी करून, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये. तसेच घरगुती व सार्वजनीक गणपती विसर्जन नदी / विहीर/ तलाव मध्ये करु नये. गणपती विसर्जन दिवशी नगरपरिषदेकडे गणेश मुर्ती दान कराव्यात असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
फलटण नगरपरिषद हद्दीतील सर्व गणेश तरुण मंडळांना फलटण नगरपरिषदेच्या वतीने आवाहन करणेत आले आहे की, गणेश उत्सव 2021 च्या अनुषंगाने लाऊड स्पिकरचा वापर ध्वनी प्रदुषण नियम 2000 नुसार करण्यात यावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवून, याकामी पोलिस स्टेशनची पूर्व परवानगी घेणेत यावी.
गणेश मंडपाच्या ठिकाणी तात्पुरती आगप्रतिबंधक उपाययोजना करणेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. ( उदा. वाळूच्या बादल्या, पाण्याचा साठा. लहान अग्श्निशमन सिलेंडर इत्यादी ) मंडळाचे प्रतिनिधी मंडपाचे ठिकाणी कायमपणे हजर ठेवणेत यावेत.
गणेश मंडळामार्फत स्त्री-भ्रुण हत्या, लेक वाचवा अभियान, स्वच्छ फलटण अभियान, मानव अधिकार आणि कर्तव्य, तसेच कोरोना विषयक जनजागृती करणेत यावी. मंडपाचे ठिकाणी शासनाने प्रतिबंध घातलेल्या उत्पादनाच्या जाहिराती करणेत येवू नये .
उत्सव काळात शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मंडपामध्ये निर्जंतूकीकरण, थर्मल स्क्रीनींगची सोय करुन श्रीच्या आरतीसाठी कमीत कमी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम ( मास्क, सॅनीटायझर इ. ) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात येवू नये. विसर्जनाच्या पारंपारीक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती मंडपात करुन, विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण गल्लीतील / कॉलनी/ वसाहतीतील सर्व घरगुती गणेश मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये. तसेच घरगुती व सार्वजनीक गणपती विसर्जन नदी / विहीर/ तलाव मध्ये करु नये. गणपती विसर्जन दिवशी नगरपरिषदेकडे गणेश मुर्ती दान करुन निर्माल्य जमा करावे.
तसेच कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच नगरपरिषद, पोलिस प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणेत यावे. तसेच सणाचे कालावधीत शासनाकडून अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणेत असे आव्हान फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments