गोविंद बेडकीहाळ आदर्श गणित-विज्ञान शिक्षक पुरस्कार सौ.सुमेधा पाटील यांना प्रदान
सातारा - येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत विद्यादानाचे कार्य करणाऱ्या सौ. सुमेधा राजेंद्र पाटील या गणित आणि विज्ञान शिक्षिका यांना नुकताच गोविंदराव बेडकिहाळ आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य अनंतराव जोशी तसेच या पुरस्काराचे मार्गदर्शक अण्णा कंग्राळकर, शाळेच्या नवीन शालाप्रमुख सौ. मनीषा मिनोचा, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. राजे महाडिक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्याचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश कला दालनात करण्यात आले होते.
सौ. सुमेधा राजेंद्र पाटील 1996 साली सांगली येथे संस्थेच्या कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला, सांगली येथे नोकरीस प्रारंभ केल्यावर गेली चार वर्षे सातारा येथे त्या अध्यापनाचे काम करत आहेत. कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजन व ईशस्तवनने झाला. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात शालाप्रमुख सौ. मनीषा मिनोचा यांनी परिश्रम सातत्य आणि चिकाटी या त्रिसूत्रीवर विद्यार्थी हा यशस्वी होत असतो .शाळा माऊली च्या हजारो विद्यार्थ्यांनी आज सातारचे नाव जगभर पसरले आहे. संस्थेने सध्याच्या परिस्थितीतही अतिशय चांगले एप शिक्षक व मुलांसाठी देऊन विद्यादानाचे अडचण दूर केली .आज पाटील मॅडम यांना मिळालेला पुरस्कार हा सर्व शिक्षकांसाठी आदर्श असा आहे.त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या हस्ते सौ. सुमेधा राजेंद्र पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन हा पुरस्कार वितरित करण्यात आला.यावेळी राजेंद्र पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे अमित कुलकर्णी यांनी भाषणात, शिक्षण क्षेत्रातील नवीन मानांकने हे उच्चविद्याविभूषित विद्यार्थी मिळवत असून यासाठी संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांना मिळालेले 100 पैकी 100 गुण हे त्याचे द्योतक आहे .संस्थेच्या आणि त्यातही सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील आदर्श शिक्षिका म्हणून सुमेधा पाटील मॅडम यांचा सन्मान हा खरोखरच सर्व शिक्षकांचा गौरव करणारा असा आहे.अशा शब्दात आपल्या शुभेच्छा दिल्या.
अण्णा कंग्राळकर यांनी आपले भाषणात या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी शाळेच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाचे योगदान किती महत्त्वाचे असते असे सांगताना आपल्या कार्यकालात विद्यार्थी घडवताना आपण मुलांसमवेत तसेच पालकांसमवेत काढलेल्या विविध शैक्षणिक सहलींची माहिती उपस्थितांना दिली.
सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सौ. सुमेधा पाटील म्हणाल्या की, सर्वांगीण विकास घडवण्याचे काम संपूर्ण जीवनात शिक्षक करत असतात. आज ज्ञानाच्या जोरावर संपूर्ण जगात शाळेचे विद्यार्थी फैलावले आहेत. शैक्षणिक कार्य करताना मिळालेला हा पुरस्कार हा केवळ माझा वैयक्तिक नसून माझ्या सोबत मला सहकार्य करणाऱ्या सर्व सहकारी शिक्षकांचा आहे. अशा पुरस्कारामुळे पुरस्कारामुळे अधिक क्षमतेने काम करण्याची ऊर्मी चैतन्य आणि बळ मिळते. मुले ही देवाघरची फुले असे म्हटले जाते, अशा या देवाघरच्या फुलासमवेत वावरण्याची संधी शिक्षक असल्यामूळेच मिळते, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या शिकवण्याच्या कामामुळे आम्हाला आनंद मिळतो, हेच आम्हाला खरोखर भाग्याचे वाटते, या पुरस्काराचा मी आनंदाने स्वीकार करते व त्याबद्दल शाळा माऊलीने माझ्यावर केलेले हे प्रेम आहे असे मी समजते अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना अनंतराव जोशी म्हणाले की, संस्थेच्या साठी सातारा येथून मी संस्थेच्या नियामक मंडाळा वर सध्या कार्यरत असून शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासमवेत सुमारे वीस ते पंचवीस हजार लोकांचे प्रतिनिधित्व मी करत आहे, संस्थेच्या कडून शालामाऊलीच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव व कार्यशील असून सौ .सुमेधा पाटील यांच्या या पुरस्काराने सर्वच शिक्षक परिवाराचे बळ वाढणार आहे .संस्थेच्या वतीने मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
उपशालाप्रमुख सौ. सुजाता पाटील यांनी आभार प्रदर्शन केले .पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. विनया कुलकर्णी यांचे सह शिक्षक, शिक्षिका तसेच कार्यालयीन कर्मचारी, पालक संघाचे प्रतिनिधी, सौ. सुमेधा पाटील यांच्या सासूबाई बनुताई पाटील, दिर कुमार पाटील, नंदकुमार पाटील, पती राजेंद्र पाटील, भाऊ धैर्यजित घाडगे व पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सौ. सुमेधा पाटील यांच्या कुटुंबीयांना क्रीडा क्षेत्राची उज्वल यशाची परंपरा लाभली आहे.
No comments