टाकूबाईचीवाडी गावाने केले शंभर टक्के लसीकरण
फलटण (प्रतिनिधी) - कोरोना विषाणू संसर्गापासुन स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत टाकूबाईचीवाडी ता. फलटण येथील १८ वर्षापुढील लोकांचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाल्याची माहिती सरपंच कृणाल झणझणे यांनी दिली आहे. शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे ते तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी लसीकरणाबाबत सजगता दाखवीत दोन्ही डोस घेतल्याने टाकूबाईचीवाडीकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फलटण तालुक्यात कोरोना विषाणू पासून स्वतः सुरक्षित राहण्यासाठी १८ वर्षे वयोगटापुढील लसीकरणाचे दोन्ही डोस सर्व ग्रामस्थांनी घेतल्याने शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे टाकूबाईचीवाडी हे फलटण तालुक्यातील पहिले गाव ठरल्याचेही झणझणे यांनी सांगितले आहे. लसीकरण पुर्ण झाल्याने गत चार महिन्यांमध्ये या गावात कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. १० मार्च २०२१ ते १७ सप्टेंबर या कालावधीत हे लसीकरण टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात आले. गावातील १८ वर्षांपुढील एकुण एक हजार २०५ लोकांचे लसीकरण करण्यात आले, यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील ३५५ पुरुष व ३२५ महिला असे एकुण ६८० जण तर ४५ वर्षापुढील २७२ पुरुष व २५३ महिला असे एकुण ५२५ जणांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी लस घेण्यासाठी सरपंच कृणाल झणझणे यांना ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सदर लसीकरणासाठी बिबी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परीचारीका, आरोग्य सेवक, आशा, अंगणवाडी सेवीका, शिक्षक, पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे महत्वपुर्ण सहकार्य लाभले.
सुरुवातीस लसीबाबत संभ्रमाचे वातावरण होते. तेव्हा ग्रामस्थांना लसीकरणाचे महत्व सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी पटवुन दिले. लस उपलब्धतेसाठीही त्यांनी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच टाकूबाईचीवाडी येथे १८ वर्षांपुढीलचे शंभर टक्के लसीकरण पुर्ण झाले. यामध्ये आरोग्य यंत्रणेचेही महत्वपुर्ण सहकार्य लाभले. - धैर्यशील तथा दत्ता अनपट, जिल्हा परिषद सदस्य, सातारा
No comments