बाळूमामांचा अवतार म्हणवणाऱ्या मनोहर मामास ५ दिवस पोलीस कोठडी ; कँसर बरा करतो म्हणून अडीच लाखाला घातला गंडा
बारामती दि.१२ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे सावंतवाडी, गोजुबावी ता. बारामती येथे असणाऱ्या मठातील मनोहरमामा भोसले याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून, कँसर रुग्णावर उपचार करतो म्हणून, बारामती येथील युवकास 2 लाख 51 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी बारामती पोलिसांनी मनोहरमामा भोसले यास अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यास 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अधिक वृत्त असे,फिर्यादी शशिकांत खरात यांच्या वडीलांना गळयावरील थायराईड कँसर झाला असल्यामुळे, फिर्यादी मित्राच्या सांगण्यावरून वडिलांना घेऊन, मौजे सावंतवाडी, गोजुबावी ता. बारामती येथे असणाऱ्या मठात गेला, तेथे मनोहरमामा भोसले यांचा सेवक विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा भेटला. त्याने सांगीतले की, मनोहरमामा यांचेकडुन भविष्य बघण्यासाठी व समस्येवर उपाय जाणुन घेण्यासाठी 5000 रुपयांची पावती फाडावी लागते. 5000 रुपयांची पावती फाडल्यानंतर, मनोहरमामा भोसले यांनी फिर्यादिस एका कोऱ्या कागदावर, कँसर असल्याची माहिती दिली व औषध म्हणून , बाभळीचा पाला आणि साखर खाण्यास सांगितले. तसेच तु पाच अमावस्येला मौजे उंदरगाव ता. करमाळा जि. सोलापुर येथील मठात जावुन पाच वाऱ्या व पाच अभिषेक करण्यास सांगीतले. मनोहरमामा भोसले यांना कोणतीही माहीती सांगीतली नसताना, मनोहरमामा यांनी फिर्यादीचे वडीलांच्या आजाराबद्दल माहीती सांगीतल्याने फिर्यादीचा त्यांच्यावर विश्वास बसला.
आमावस्येला फिर्यादी मौजे सावंतवाडी, गोजुबावी येथील मनोहरमामा यांचे मठात गेला असता, मनोहरमामा यांनी लेखी स्वरुपात, वडिलांना पिवळा भंडारा औषध म्हणून दिला , व उंदरगाव येथे 5 आमावस्या करायला लावल्या व येणाऱ्या गुरुवारी सव्वा लाख रुपये चढावा आणुन दे, तुझे वडीलांना निट करतो. असे तोंडी आश्वासन दिले.
नंतर फिर्यादी याने हातउसणे एक लाख रुपये व घरातील पंचविस हजार रुपये असे एकुण सव्वा लाख रुपये मनोहरमामा यांचे मौजे सावंतवाडी,गोजुबावी येथील मठामध्ये मनोहरमामा यांचे पायावर चढावा ठेवला. तरी देखील फिर्यादीच्या वडीलांना कोणत्याही प्रकाराचा फरक पडला नाही.
त्यानंतर फिर्यादी याने मठात जावुन पुन्हा मनोहरमामा यांची भेट घेतली, व डॉक्टर गादीया यांनी सांगीतलेली हकीकत सांगीतली. त्यावर मला मनोहरमामा म्हणाले की, मी तुझ्या वडीलांचे आपरेशन होवु देत नाही. विना आपरेशनचे निट करतो, माझ्या उंदरगावच्या मठाच्या बाजुला नाथबाबाला घेवुन जा, व तेथील झाडाखाली एक लाख रुपयाचा चढावा ठेव, चढावा नाही ठेवला तर तुझ्या वडीलांचे व तुझे जिवाला धोका आहे.चढावा ठेवल्यावर मागे वळुन पाहु नको.
त्यांनतर फिर्यादी ने हातउसणे पैसे घेवुन उंदरगावचे मठात जावुन एक लाख रुपयाचा चढावा ठेवला.
मनोहरमामा भोसले यांनी सांगीतलेप्रमाणे फिर्यादी याने एकुण सव्वा दोन लाख रुपयाचा चढावा, 5 अभिषेकाचे एकुण 6,500 रुपये, तसेच मनोहरमामा यांचे प्रती भेट 5000/-रुपये प्रमाणे एकुण 4 भेटीचे 20,000/- रुपये असे एकुण 2,51,500/- रुपये फसवणूक केल्याची फिर्याद शशिकांत सुभाष खरात (वय 23) व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान, रा.साठेनगर, कसबा बारामती यांनी गुरूवार दि. ९ सप्टेंबर रोजी दिली आहे.
त्यानुसार बारामती पोलिस ठाण्यात मनोहरमामा भोसले, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. बारामतीसह अनेक ठिकाणच्या गुन्ह्यात आवश्यक असलेला संशयित आरोपी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) याला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सालपे येथील एका फार्म हाऊसवर शुक्रवार (ता.१०) रोजी पकडले होते. अटक आरोपी मनोहरमामा वगळता उर्वरित विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे या आरोपींना अद्याप फरार आहेत, त्यांच्या मागावर पोलिस आहेत.
No comments