राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द ; अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ सप्टेंबर - महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात केलेला आहे. कोर्टामध्ये राज्य शासनाने योग्य भूमिका मांडली नसल्यामुळे ओबीसी लोकांच्यावर अन्याय झाला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाले असल्याची टीका भाजपा खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे या विषयावर संपूर्ण राज्यात आंदोलन करून निवेदने देण्यात आली. फलटण तालुक्यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार चांदगुडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हा महिला सचिव सौ. मुक्ती शहा, ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेश शिंदे, युवा मोर्चाचे सोमनाथ ऐजगर, नितीन वाघ, निलेश चिंचकर, शशिकांत रणवरे, महिला शहराध्यक्ष सौ. विजया कदम, विस्तारक शरद झेंडे, सुरज तांदळे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले, वास्तविक राज्यशासनाला एम्पिरिकल डाटा तयार करून, ओबीसींचे आरक्षण वाचवता आले असते, परंतु या सरकारला ओबीसी समाजावर अन्याय करायचा दिसत आहे, त्यामुळेच न्यायालयात ओबीसींची बाजू व्यवस्थितरीत्या मांडली नाही. व ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. त्यामुळे भविष्यातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजातील चांगल्या व सर्व सामान्य कार्यकर्त्यांना यामुळे न्याय मिळणार नाही . या सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत.
ओबीसी समाजावरील अन्याय दूर न झाल्यास भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये तीव्र आंदोलन उभे केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ही असे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिला.
No comments