भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : – आगामी काळात शासनाच्या सर्व विभागांमध्ये पद भरती करताना उमेदवारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी व परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्त्याखालील शासकीय कार्यालयातील पदभरतीच्या अनुषंगाने सुधारित परीक्षा पद्धती संदर्भात मंत्रालयात श्री.भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव प्रशांत साजणीकर, महाआयटीचे मुख्य परिचालन अधिकारी प्रसाद कोलते, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव सुधीर निकाळे तसेच परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परीक्षा देणाऱ्या उमेदवाराची चेहरा ओळख सांगणारे तंत्रज्ञान तसेच जॅमर लावणे यासारख्या उपायांचा समावेश परीक्षा पद्धतीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. परीक्षा घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेल्या संस्थांनी पेपर फुटू नये व डमी उमेदवार परीक्षेस बसू नये यादृष्टीने काळजी घ्यावी. परीक्षेत काही गडबड झाल्यास संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिला.
No comments