सत्ताधाऱ्यांनी फलटणचा कोणताही ठोस विकास केला नाही - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, अमोल सस्ते, बजरंग गावडे, सचीन अहिवळे, मदलसा कुंभार व अन्य |
फलटण २९ सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - : फलटणकरांनी विश्वासाने गेली 30 वर्षे ज्यांना नगरपालीकेची एकहाती सत्ता दिली, त्यांना नगर पालीकेच्या माध्यमातुन शहराचा कोणताही ठोस विकास साधता आला नाही हे मोठे दुर्दैव आहे. दरवर्षी नगर परिषदेकडे येणारा कोट्यावधी रुपयांचा निधी जातो कुठे हेच कळत नाही, भ्रष्टाचार करायला लिमिटच राहिले नाही. फलटण नगर पालिकेच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, सत्ताधार्यांना भस्म्या झालाय का ? असा सवाल खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे दुचाकी रॅलीद्वारे निषेध मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अमरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, मदलसा कुंभार, मीना नेवसे, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, जितेंद्र सरगर, बबलू मोमीन, रियाजभाई इनामदार, उषा राऊत, मुक्ती शहा आदी उपस्थित होते.
फलटण शहरात सद्य परीस्थितीत नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा गढूळ पाणीपुरवठा, सावर्जनिक स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था, भुयारी गटार योजना, रस्ते व्यवस्थापन, झाडेझुडपांची वाढ, डासांचा प्रादुर्भाव, साथीच्या रोगांचा फैलाव, पंतप्रधान आवास योजनेमध्ये अनुदान वाटपातील विलंब अशा विविध प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. मात्र या परीस्थितीतही फलटण नगरपालिकेचे नागरीकांचे प्रश्न सोडविण्याचे धोरण आनास्थेचे आहे. नगरपरिषदेच्या या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठीच भाजपच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगतानाच फलटण शहरात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आहे. या साथ रोगांमुळे नागरिकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे, या परीस्थितीत फलटण नगरपरिषद केवळ बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केला.
मालमत्ता कर दुप्पट करूनही शहराच्या प्राथमिक सुविधा सत्ताधारार्यांना पुरवता येत नाही. सत्ताधार्यांना पालिकेचा कारभार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात. भाजपच्या माध्यमातून आम्ही फलटण शहर स्वच्छ व रोगमुक्त करू व शहराचा आदर्शवत विकास करू असे खा. रणजितसिंह यांनी सांगितले.
यानंतर भारतीय जनता पक्षाच्यावतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना खा. रणजितसिंह व अन्य पदाधिकार्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
No comments