पत्रकार भवन, फलटण येथील मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा - सुभाष भांबुरे
फलटण (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका गेले अनेक दिवस बंद ठेवण्यात आली होती. स्पर्धा परीक्षा जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके व अभ्यासिकेची आवश्यकता ओळखून अभ्यासिका गुरुवार दि. २३ सप्टेंबर पासून पूर्ववत सुरु करण्यात आली असून, मोफत अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष भांबुरे यांनी केले आहे.
माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालय, फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार आणि बुलढाणा अर्बन बँक यांचे संयुक्त सहभागाने गेली अनेक वर्षें सुरु असलेली माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती ती पुन्हा शासनाच्या नियमांचे पालन करुन, कोरोना पासून बचावात्मक गोष्टीं, नियम, निकषांचा वापर करुन विद्यार्थ्यांची मर्यादीत संख्या ठेऊन सुरु करण्यात येत आहे.
या अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी अध्यक्ष, माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालय या नावे स्पर्धा परीक्षा अभ्यास क्रमासाठी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करुन आपला प्रवेश नव्याने निश्चित करावा, जुन्या विद्यार्थ्यांनीही नव्याने आपला अर्ज भरणे अनिवार्य आहे.
कोरोना अटींचे पालन करुन ही अभ्यासिका सुरु ठेवणार असल्याने ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अगोदर येतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल.
अभ्यासिकेत प्रवेश घेऊन तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या मोफत अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार कै. हरिभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालय, फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार आणि बुलढाणा अर्बन बँक शाखा फलटण यांचे वतीनेही करण्यात आले आहे. संपर्क मोबाईल क्रमांक 9822414030.
No comments