खड्ड्यांमध्ये झाडे लावणे हे विरोधकांचे नाटक ; तालुक्याच्या विकासात विरोधकांचे काय योगदान आहे ? - श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ सप्टेंबर - विरोधकांना फलटण शहराचा विकास हवा आहे या गोष्टीवरच माझा विश्वास नाहीये. विरोधकांना केवळ स्वत:चा विकास करायचा आहे. फलटण तालुक्याच्या विकासाबाबत यांचे कुठलेही योगदान आपल्याला दिसले नाही. भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत, परंतु हे सर्व रस्ते मंजूर असून, इलेक्शनपूर्वी सर्व रस्ते होऊनही जातील. नगरपालिकेच्या कामांविरोधात तक्रार करणे हा या विरोधकांचा अव्याहतपणे सुरू असणारा उद्योग गेली पाच वर्ष सुरू आहे, जर यांना विकासच हवा असता तर त्यांनी नगरपालिकेच्या विकास कामांमध्ये अडचणी आणल्या नसत्या. अनेक कामांविरोधात त्यांनी तक्रारी केल्या पण एकाही तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने लागला नाही. खड्ड्यांमध्ये झाडे लावणे हे विरोधकांनी इलेक्शन पूर्वी केलेले नाटक असल्याची टीका विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
फलटण शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत भारतीय जनता पार्टी व नगरपरिषदेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी रस्त्यातील खड्डयांमध्ये वृक्षरोपण करून आंदोलन छेडले होते. या पार्श्वभूमीवर श्रीमंत रघुनाथराजे बोलत होते.
खड्ड्यांमध्ये झाडे लावणे हे विरोधकांचे नाटक आहे, फलटण तालुक्यात, कोव्हीडच्या वेळी मोठा खड्डा पडला होता, त्यावेळेस ही मंडळी कुठे होती? आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोव्हीड काळात लोकांच्यात फिरून त्यांच्या अडचणी दूर केल्या, त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. हे काम करत असताना माझ्यासह श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत शिवांजलीराजे, पदाधिकार्यांना कोरोनाची बाधा झाली, काहींचे प्राणही गेले परंतू आम्ही मदत कार्य थांबवले नाही. बाजार समिती मार्फत संपूर्ण फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघात फिरत्या दवाखान्याची सोय करण्यात आली होती. त्यावेळी ही झाडे लावणारी मंडळी कुठे होती, असा सवालही श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी उपस्थित केला.
विरोधक नेहमी म्हणतात की रामराजे यांनी काम केले नाही, पण तुम्ही जो कारखाना काढला तो कोणत्या उसावर काढला, उपळवे परिसरात साखर कारखाना उभरण्यासारखी परिस्थिती होती का? आज रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या भक्कम विकासामुळे फलटण तालुक्यात ऊस बागायती होत आहे. पूर्वी या भागातील सभासदांना कुसळी सभासद म्हणायचे, परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही, आज त्या परिसरात ऊस उत्पादन घेतले जात आहे. हे धोम-बलकवडी च्या कालव्यामुळे शक्य झाले असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
No comments