उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी प्रकरणी शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या चौकशीचे आदेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ ऑक्टोबर - विडणी ता. फलटण येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या नियमबाह्य नियुक्त्या व इतर तक्रारीच्या अनुषंगाने, सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची चौकशी करण्याचे आदेश उपसंचालक, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे येथील छात्र शिक्षक कृती संस्था यांनी शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिलेल्या तक्रारी नुसार, महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव यांनी, त्यांना सचिव पदाचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना, बनावट रेकॉर्ड तयार केले व सातारा जिपचे तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री राजेश क्षीरसागर यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून बनावट शिक्षक मान्यता मिळवली. रोस्टरचे पालन केले नाही तसेच जाहिरात दिली नाही, विषयाचे पालन केले नाही, आरक्षण नसताना पदे भरली आहेत, इतर मागासवर्गाची तीन पदे मंजूर असताना चार पदे भरली आहेत, बाळासाहेब खंडेराव वाघमारे शिक्षण सेवक( एसटी) नसताना एसटी दाखवून मान्यता दिलेली आहे, सेवाज्येष्ठता डावलून मुख्याध्यापकाची मान्यता दिलेली आहे, इत्यादी बाबींसाठी आर्थिक व्यवहार करून अनियमितता केली असल्या बाबतची तक्रार देण्यात आली होती. या प्रकरणी सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याबाबतचे निर्देश डॉ.वंदना वाहूळ (शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहेत.
No comments