दत्त इंडिया यंदा विक्रमी गाळप करणार : शेतकऱ्यांना उसाला वेळेवर व नियमांप्रमाणे पेमेंट होणार
दत्त इंडियाच्यावतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत करताना परीक्षित रूपारेल, शेजारी जितेंद्र धरू व मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी साखर कारखान्याच्या सन २०२१ - २०२२ मधील गळीत हंगामाचा शुभारंभ दि. ४ नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक करण्यात येणार असून कारखाना विस्तार वाढीचे काम युद्धपातळीवर सुरु असून यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून विक्रमी गाळपाचा निर्धार दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धरु यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, दत्त इंडियाचे संचालक परिक्षीत रुपारेल, कारखान्याचे प्रशासनाधिकारी अजित जगताप, कामगार युनियनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यालयात आयोजित बैठकीत संचालक जितेंद्र धरु बोलत होते.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे वेळेवर ऊसाचे पेमेंट, कामगारांना नियमीत पगार, दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कामगारांना १९ % बोनस, प्रत्येकी १० किलो साखर आणि न्यू फलटण शुगर वर्क्सच्या कालावधीतील थकीत पगारापैकी एक पगार कामगारांना देण्याची घोषणा करतानाच ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी दत्त इंडियाकडे पाठवावा असे आवाहन यावेळी संचालक जितेंद्र धरु यांनी केले.
एन. सी. एल. टी. न्यायालयाने ज्या शेतकऱ्यांचे क्लेम तांत्रिक कारणाने फेटाळले होते व जे शेतकरी न्यू फलटण शुगर वर्क्स लि., साखरवाडी काळातील थकीत ऊस बिला पासून वंचीत राहिले अशा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे संकेत या बैठकीत प्राप्त झाले, सदर थकीत ऊस बिलापैकी काही रक्कम या शेतकऱ्यांना लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे.
मागील थकीत पगारापैकी एक पगार, १९ टक्के बोनस आणि १० किलो साखर मोफत या कारखाना व्यवस्थापनाच्या निर्णयाचे स्वागत कामगारांनी कारखाना कार्यस्थळावर फटाके फोडून आनंदोत्सवात केले.
सदर बैठकीला फलटण तालुका साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, राजेंद्र गायकवाड, पोपट भोसले, खजिनदार गोरख भोसले, तंटामुक्तीचे अध्यक्ष महेश भोसले, संजय जाधव, संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, महेश पवार, लक्ष्मण साळुंके, सुरेश भोसले व युनियनचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments