नवमतदार नोंदणीसाठी ‘निवडणूक साक्षरता मंच’ महत्त्वाचा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
'Election Literacy Forum' important for new voter registration - Chief Electoral Officer Shrikant Deshpande
मुंबई -: मतदार म्हणून नोंदणी करणे हा लोकशाही सुदृढ करण्याचा महत्त्वाचा भाग असून यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. याचाच भाग म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण या विभागाने शासन निर्णय निर्गमित करून प्रत्येक विद्यापीठांमध्ये ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. या दृष्टीने महाविद्यालय स्तरावर ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करून ती लोकशाही सक्षमीकरणाची व्यासपीठे व्हावीत, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.
विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजन केंद्राच्या समन्वयकांसोबत ऑनलाईन बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री.देशपांडे बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाई, एनएसएस विद्यापीठ संचालक, समन्वयक त्याचबरोबर मुख्य निवडणूक कार्यालयाचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे उपस्थित होते.
लोकशाही क्लब’मार्फत प्रत्येक विद्यापीठे, महाविद्यालये, विद्यालयाने नवमतदारांची नोंदणी होण्यासाठी सहभाग घ्यावा. क्लबच्या मंचावर राजकीय नेते, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. मतदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या ई.व्ही.एम.मशीनची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी जेणेकरून हा मंच आणखी सक्षम करता येईल, अशाही सूचना श्री.देशपांडे यांनी यावेळी केल्या.
मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे काम निवडणूक विभागाद्वारे सातत्याने करण्यात येते. यावेळी दि. 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांमार्फत जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी करण्यासाठी जनजागृती येत असून दि. 13, 14, 27 आणि 28 नोव्हेंबर 2021 या दिवशी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात येत असून यात ग्रामपंचायत स्तरावर मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. या विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना केंद्रातील जे जे विद्यार्थी उत्कृष्ट काम करतील, अशा विद्यार्थ्यांना निवडणूक कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनी मानचिन्हे व प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी दिली.
राष्ट्रीय सेवा योजना केंद्राचे संचालक प्रभाकर देसाई यावेळी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना केंद्रामार्फत एक परिपूर्ण असा रोडमॅप तयार करून तो निवडणूक विभाग तसेच महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
No comments