Breaking News

गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर

Funds of Rs. 122 crore 26 lakh 30 thousand sanctioned for crop damage due to hailstorm and unseasonal rains

    मुंबई -: गारपीट व अवेळी पावसामुळे  मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे फळपिकांचे नुकसान झाले.  गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने  शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्या शेतीचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

    गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य  आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण १२२ कोटी २६ लाख ३० हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली असून श्री.वडेट्टीवार यांनी तातडीने विभागीय आयुक्तांना निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

    गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी कोकण विभागासाठी २९ लाख ३० हजार रुपये, पुणे विभागासाठी ३ कोटी १६ लाख ७५ हजार रुपये, नाशिक विभागासाठी ५९ कोटी ३६ लाख ३४ हजार रुपये, औरंगाबाद  विभागासाठी १५ कोटी ५१ लाख ५४ हजार रुपये, अमरावती विभागासाठी ३८ कोटी ८७ लाख ५६ हजार रुपये, नागपूर विभागासाठी ५ कोटी ४ लाख ८१ हजार रुपये  इतका निधी मंजूर झाला आहे.

    गारपीट व अवेळी पावसामुळे  कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे- फळबागांचे  मोठे नुकसान झाले. या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या भागाची पाहणी करून नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा  दौरा केला. या दौऱ्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना श्री.वडेट्टीवार यांनी  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. त्यानंतर महसूल व वन विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

No comments