महाआघाडी म्हणजे घोटाळे करून स्वतःचा विकास करणे - किरीट सोमय्या
फलटण - (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 6 ऑक्टोबर - महाविकास आघाडीचा अर्थ,आघाडीतील नेत्यांनी घोटाळे करून स्वतःचा विकास करणे असा आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या घोटाळ्या विषयी जनता आमच्याकडे तक्रारी करत असेल तर त्याला वाचा फोडणे हे आमचे काम आहे, त्यामुळेच त्यांनी केलेले घोटाळे हे आम्ही बाहेर काढतो आहे. आणि घोटाळे बाहेर काढल्या नंतर महाआघाडीचे नेते आमच्यावर आब्रू नुकसानी सारखे दावे दाखल करतात, असल्या धमक्यांनी आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझे महा विकास आघाडीच्या नेत्यांना एवढेच सांगणे आहे की, तुम्ही घोटाळे करणे बंद करा आणि जे घोटाळे केले त्याचा हिशोब चुकता करा, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील राजभवन या निवासस्थानी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या बोलत होते. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, भाजपा ओबीसी सेलचे राजेश शिंदे, नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे, सुशांत निंबाळकर, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पत्रकार परिषदेमध्ये बोलतानामाजी खासदार किरीट सोमय्या समवेत जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर |
कोल्हापूर प्रवेश बंदी संदर्भात बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, हसन मुश्रीफ साहेबांचा घोटाळा मी बाहेर काढणार होतो, म्हणून माझ्यावर कोल्हापूर बंद केली, परंतु त्याची अंमलबजावणी केली मुंबईमध्ये. मला मुंबईच्या घरातून बाहेर पडू दिले नाही, त्या संदर्भात आम्ही मानवाधिकार आयोग तसेच पोलीस प्राधिकरण याकडे याचिका दाखल केली आहे. त्याचबरोबर मुरगूड पोलिस स्टेशन येथे मी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, कालच मुरगूड पोलिस स्टेशन कडून मला कळविण्यात आले आहे की तुमची तक्रार आम्ही अँटी करप्शन कडे पाठवत आहोत, जर माझ्या तक्रारीत सत्य नसतं तर पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेतली नसती व अँटी करप्शन कडे पाठवली नसती असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.
किरीट सोमय्या हे फक्त राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या कारखान्यांच्या विरोधात कारवाई करतात, भाजपच्या नेत्यांचे देखील साखर कारखाने आहेत आणि त्यामध्ये देखील घोटाळे आहेत असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असल्याच्या प्रश्नावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे वडूज मध्ये जरंडेश्वर कारखान्या संदर्भातच केले होते, मग आमचा त्यांना एकच प्रश्न आहे की, जरंडेश्वर कारखाना कोणाचा आहे ? याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे. कारखाना घोटाळ्याबाबत दाखल केलेले याचिकेद्वारे उच्च न्यायालयाने ईडी ला सांगितले आहे की, घोटाळे असणाऱ्या कारखान्याची चौकशी करावी, त्याप्रमाणे ते चौकशी करीत आहेत, जरंडेश्वर कारखाना जर अजित पवारांचा असेल तर त्यांनी तसे सांगावे की हा माझा कारखाना आहे, मग जरंडेश्वर कारखान्याचे शेतकरी जे माझ्याकडे आलेले आहेत, त्यांच्यावर अन्याय का करता. आणि जर अजितदादांनी तसं सांगितलं नाही तर पुढील काही कालावधीत आम्ही जरंडेश्वर कारखाना कोणाचा आहे ते सिद्ध करणार आहोत असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
मागील दीड वर्षात ठाकरे सरकारने जी घोटाळ्याची परंपरा सुरू केली आहे, त्यात आतापर्यंत 24 घोटाळे मी बाहेर काढलेले आहेत, महाराष्ट्रातून विविध भागातून मला नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात माझ्याकडे, त्या अनुषंगाने मी त्या त्या भागात जाऊन, त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो, जरंडेश्वर कारखाना येथील शेतकरी सभासदांनी देखील माझ्याकडे तक्रार केल्यामुळे, मी जरंडेश्वर कारखान्याचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी लक्ष घालत असल्याचे किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
No comments