स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींजींच्या योगदानाची दखल सार्या जगाने घेतली : वसंत भोसले
व्याख्यानाप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले. व्यासपीठावर सुभाषराव बेडके (सूर्यवंशी), रविंद्र बेडकिहाळ, प्राचार्य शांताराम आवटे. (छाया - बंडू चांगण, फलटण.) |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - ‘‘महात्मा गांधींना चार वेळा मारण्याचा प्रयत्न झाला तरी ते बचावले. परंतु अखेरचा नथूराम गोडसेंचा प्रयत्न यशस्वी झाला मात्र अजूनही गांधीजी विचाराने जिवंतच आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नसलेल्या काही शक्ती आजही अनुल्लेखाने गांधीजींना मारत आहेत. पण त्यांच्या सत्य, अहिंसा व शांती या तत्त्वामुळे ते आजही केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांमधून विशेषत: दक्षिण अफ्रिकेमध्ये वंदनीय आहेत. म्हणून त्यांच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची दखल सार्या जगाने घेतली आहे’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व दैनिक लोकमत (कोल्हापूर) संपादक वसंत भोसले यांनी केले.
येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नामदेवराव सूर्यवंशी - बेडके महाविद्यालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे योगदान’ या विषयावर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानात भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव बेडके (सूर्यवंशी) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते.
1920 नंतर सुरु झालेल्या महात्मा गांधीजींच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती सांगताना भोसले म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गांधींच्या योगदानाची पार्श्वभूमी अहिंसक पद्धतीने शांततापूर्ण आंदोलनाची, उपोषण, सत्याग्रह व सामाजिक बहिष्काराची आणि सर्व जाती-जमातींना बरोबर घेऊन जाण्याची होती. हरिजन आणि मुसलमान यांनाही भारतीय समाजातील महत्त्वाच्या घटकाची भूमिका दिली. त्यामुळे ते फक्त काँग्रेसचे नेते राहिले नाहीत तर राष्ट्राचे वंदनीय नेते व राष्ट्रपिता झाले.’’
‘‘आज महात्मा गांधींचे नाव फक्त राजकारणापुरते वापरले जाते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही तसेच झाले आहे. गांधींचे व या महापुरुषांचे विचार न घेता फक्त त्यांच्या नावाचा वापर करुन पुन्हा काही जातीयवादी, प्रतिगामी शक्ती आधुनिक भारतीयकरणाच्या आडून स्वत:चे विचार बळकट करुन समाजाला वेठीस धरत आहेत’’, असेही भोसले यांनी यावेळी नमूद केले.
‘‘महात्मा गांधींच्या योगदानातील महत्त्वाचे सूत्र ‘खेड्याकडे चला, ग्रामोद्योग सुरु करा’ हे आज मागे पडले आहे’’, असे सांगून भोसले पुढे म्हणाले, ‘‘आज खेडी स्वयंपूर्ण करण्याऐवजी नागरी, शहरी भाग मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहेत. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे व खेडी ओस पडत चालली आहेत भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पुन्हा हे सूत्र प्रभावी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी, सर्व पक्षांनी आग्रह धरला पाहिजे.’’
‘‘सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारच्या कार्याचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जबरदस्त वचक होता’’, असे निदर्शनास आणून, ‘‘सातारा ही शिवछत्रपतींची राजधानी असल्याने येथे पत्री सरकारचे मोठ्या प्रमाणावर स्मारक व्हावे’’, अशी अपेक्षाही भोसले यांनी व्यक्त केली.
‘‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचा शब्द हा जनतेने मंत्र म्हणून स्वीकारला. कोट्यावधी भारतीय या ‘चलेजाव’ च्या मंत्रामुळे एकत्र आले आणि ब्रिटीशांना भारतातून जावे लागले. यशवंतराव चव्हाण यांचेही यात फार मोठे योगदान होते’’, असे सुभाषराव बेडके (सूर्यवंशी) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सातारा जिल्ह्याचे तसेच फलटण तालुक्याचेही जे योगदान आहे त्याचा इतिहास नव्या पिढीला कळावा म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा’’, अशी अपेक्षा रविंद्र बेडकिहाळ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस वंदन केल्यानंतर मसाप फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी प्रास्ताविक करुन व्याख्यानमालेची सविस्तर माहिती दिली. कार्यवाह अमर शेंडे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला.
कार्यक्रमास श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब मोदी, चंद्रकांत पवार, शिवाजीराव बेडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दीपक राऊत, मसाप शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, उपाध्यक्ष प्रा.रविंद्र कोकरे, प्राचार्य सुभाष देशपांडे, जांभेकर हायस्कूलचे प्राचार्य भिवा जगताप, लोकमत सातारा आवृत्ती प्रमुख दीपक शिंदे, लोकमत प्रतिनिधी नासिर शिकलगार, पत्रकार स.रा.मोहिते, प्रा.अशोक शिंदे यांचेसह प्राध्यापक, शिक्षक, मसाप शाखा सदस्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन डॉ.तेजश्री राऊत यांनी केले तर आभार प्रा.दयानंद बेडके यांनी मानले.
No comments