राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविणार – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
New National Education Policy to be implemented in the state in an excellent manner - Higher and Technical Education Minister Uday Samant
पुणे - राज्यातील विद्यार्थी देशातच नव्हे तर जगात दर्जेदार शिक्षणाने समृद्ध व्हावा यासाठी राज्यात उत्कृष्ट पद्धतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी केली जाईल. एनईपीमध्ये अजून काही चांगल्या बाबी सुचवण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने राज्य शासनाला शिफारसींचा अहवाल दिला आहे. त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यकतेप्रमाणे केंद्र शासनाला शिफारसी करण्यात येतील, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
कोरोना परीस्थितीच्या टाळेबंदीनंतर पहिल्यांदाच महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्री. सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत आणि संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीईओपी) येथे आयोजित कार्याक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी.बी. आहुजा, तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.सामंत म्हणाले, कोरोना महामारीच्या प्रारंभी या विषाणूचे स्वरुप माहिती नसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची सुरक्षितता लक्षात घेत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर न्यायालयीन याचिका झाल्यावर राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने देशात उत्कृष्ट अशा ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रात घेतल्या. आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे दिसल्याने विद्यार्थ्यांचे दैनंदिन जीवन, शिक्षण परत व्यवस्थित सुरू करण्यासाठी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्रातील शैक्षणिक सुविधा देशात प्रगत आहेत. विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी ऑफलाईन शिक्षण आणि परीक्षा घेण्यास शासनाचे प्राधान्य राहील. परंतु, काही ठिकाणी अपरिहार्यता असल्यास ऑनलाईन शिक्षण व परीक्षा घ्याव्या लागल्या तरी त्याबाबतही शासन परिस्थितीनिहाय सकारात्मक निर्णय घेईल.
महाविद्यालये सुरक्षित वातावरणात सुरू व्हावीत यासाठी 'मिशन युवा स्वास्थ्य' अंतर्गत 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड लसीकरण करण्याचे भव्य अभियान हाती घेतले आहे. राज्यातील सुमारे 5 हजार महाविद्यालयात 40 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण या मोहिमेअंतर्गत केले जाणार आहे.
सुमारे 19 महिन्यानंतर महाविद्यालये सुरु होत असताना महाविद्यालयात येण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता व्हावी यासाठी आता सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनीही यापुढे वर्गात प्रत्यक्षच हजर राहणार; त्यासाठी 'मिशन ऑफलाईन' राबवणार हे आता ठरवले पाहिजे. त्यासाठी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तीन टप्याहीमध्ये राबवण्यात येणार असून पहिल्या टप्यासात शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कुठल्याही आर्थिक निधीची आवश्यकता नसलेल्या बाबी, दुसऱ्या टप्या वत मध्यम स्वरुपाचा निधी आवश्यक असणाऱ्या बाबींचा समावेश असेल. तर तिसऱ्या टप्याप्त दीर्घकालीन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केली जाणार आहे.
शिक्षणाचाच नव्हे तर जीवनाचा सर्वांगाने विकास व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात संशोधन केंद्र तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारण्यात येणार आहे, असेही श्री. सामंत म्हणाले.
उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांनी मायभूमीला कधीही विसरु नये; देशात परत येऊन राज्याची, देशाची सेवा करावी आणि देशाच्या विकासात भर घालावी, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अनुकंपा तत्वावर भरतीला गती, प्राध्यापक, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्त्व लागू करण्याचा निर्णय तसेच प्राध्यापकांच्या भरतीप्रकियेला गती देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
यावेळी पुणे शहरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेले ‘सीईओपी’मधील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचा ‘कोरोना योद्धा’ म्हणून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक श्री. प्रतापराव पवार यांनी केले तर आभार संचालक डॉ. आहुजा यांनी मानले.
प्रारंभी ढोल- ताशांचा गजरात विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात स्वागत करण्यात आले.
वाडिया महाविद्यालयातही विद्यार्थ्यांचे स्वागत
वाडिया महाविद्यालयातही श्री. सामंत यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. अभय हाके, डॉ. मनोहर सानप, डॉ. अशोक चांडक, उच्च शिक्षणचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव यांच्यासह संस्थेच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील गुणवतं विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
No comments