Breaking News

कोणीही तिकिट फिक्स समजू नये ; श्रीमंत रामराजे यांच्या गुगलीवर अनेकांच्या दांड्या उडाल्या

मंगळवार पेठ फलटण येथे वाचनालय व जिम इमारतीचे उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (छाया - गंधवार्ता,फलटण)
    No one should understand the ticket fix; Many wickets on Shrimant Ramraje's googly
Inauguration of Library and Gym Building by Shrimant Ramraje Naik Nimbalkar

    फलटण  (ॲड. रोहित अहिवळे) दि. ४ ऑक्टोबर - कुठल्याही नगरसेवकाने असे समजू नये की, आगामी नगर पालिका निवडणुकीचे आपले तिकीट फिक्स आहे. मी माझ्या पध्दतीने ते फिक्स करणार आहे, हे ऐकून इथे जमलेले बरेचजण खुश होतील, पण याचा अर्थ असाही नाही की, विद्यमान नगरसेवकांना तिकीट मिळणार नाही, असा गुगली चेंडू विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाकून अनेकांच्या दांड्या उडवल्या.

    श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते रविवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी फलटणमधील विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटने संपन्न झाली. त्याप्रसंगी मंगळवार पेठ फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक सनी संजय अहिवळे, नगरसेविका ॲड. मधुबाला दिलीपसिंह भोसले,  सौ. सुवर्णाताई खानविलकर, सौ. प्रगती कापसे, सौ वैशाली चोरमले सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. दिपाली निंबाळकर, नगरसेवक विक्रम जाधव, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, जे. एस. काकडे, मुख्याधिकारी संजय गायकवाड नगर अभियंता साठे, कंत्राटदार व्ही. स्क्वेअर कन्स्ट्रक्शन चे विकास निंबाळकर, माधव जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तालिम जिम इमारतीचे उद्घाटन प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर (छाया - गंधवार्ता,फलटण)

कार्यकर्त्यांना कोणी हात लावला तर मी गप्प बसणार नाही - श्रीमंत रामराजे 

    पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, नगरसेवकांनी केलेली कामे, दिलेले योगदान, नागरिकांच्या सोडवलेल्या अडचणी या सर्वांचा विचार करूनच तिकीटांचा विचार होणार आहे. निवडणुकीची चाहूल लागली आहे, आमच्या कार्यकर्त्यांना विरोधकांचे फोन,धमक्या येऊ लागल्या आहेत, त्यांना बोलवण्यात येत आहे, धमक्या दिल्या जात आहेत, पण माझ्या कार्यकर्त्यांना कोणी हात जर लावला, तर मी काही गप्प बसणार नाही, असा इशारा विरोधकांना श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिला. तसेच कार्यकर्त्यांनी सावध रहावे, जपून रहावे, काही अडचण आली तर मला फोन करावा असे आवाहनही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारत 

कोरोना संपला नाही, मास्क घाला - श्रीमंत रामराजे 

    कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी तो अद्याप संपलेला नाही,   अद्याप काळजी घ्यावी लागेल, आपण सर्वजण गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून आमदारापर्यंत व शेतकऱ्यांपासून हमालांपर्यंत सर्वांनी कोरोनाचा  त्रास भोगलेला आहे,  त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, काही होत नाही... असे म्हणून मास्क घालणे बंद करू नका. घराच्या बाहेर पडताना मास्क जरूर घालावे असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले.

फलटणची आधुनिकतेकडे वाटचाल - श्रीमंत रामराजे 

    21 व्या शतकातील आधुनिक फलटण करण्याचा मी शब्द दिला होता, त्याप्रमाणे टप्याटप्याने फलटणची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू आहे. त्यानुसार मटण मार्केट मच्छी मार्केट ची उभारणी चालू आहे. त्याच धर्तीवर शहरात इतरही ठिकाणी आधुनिकतेची कामे चालू आहेत. भुयारी गटार योजना पूर्ण होत आली असून, सर्व रस्त्यांची कामे सुरू असून तीही लवकरच पूर्ण होतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय - अंतर्गत फर्निचर
    कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न येत्या काही दिवसात सोडविण्याचे आश्वासन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले, त्याचबरोबर आगामी नगरपालिका निवडणुकीत मंगळवार पेठेतून  राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून देण्याचे आवाहनही यावेळी श्रीमंत रामराजे यांनी केले.

    नगरपालिकेच्या या कार्यक्रमात आज 30 वर्षात पहिल्यांदाच असे होत आहे की कै. नंदकुमार भोईटे नाहीत अशी खंत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

    कार्यक्रमाच्या सुरवातीस नगरसेवक सनी अहिवळे यांनी प्रभागाच्यावतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची व जिम साहित्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

    विधानपरिषदेत सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व इतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे व नगरसेवक सनी संजय अहिवळे यांनी केले. सूत्रसंचालन मुधोजी हायस्कूलचे उपप्राचार्य सुधीर अहिवळे यांनी केले.

No comments