फलटण बाजार समितीने राबवलीले प्रकल्प दिशादर्शक - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते देण्यात आलेला पुरस्कार, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हॉईस चेअरमन भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर यांनी स्वीकारला. यावेळी संचालक प्रकाश भोंगळे, संजय कदम, परशुराम फरांदे, चांगदेव खरात, पत्रकार सुभाष भांबुरे, विजय भिसे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य शेतकर्यांसाठी लाभदायक असून, बाजार समितीने राबवलीले प्रकल्प हे राज्यातील सर्व बाजार सामित्यांसाठी दिशा दर्शक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
मुंबई येथील वाय. बी.चव्हाण सेंट्रल हॉल येथे नवभारत या वृत्तपत्राची मराठी आवृत्ती नवराष्ट्र यांच्यावतीने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेल्या विविध उपक्रम व केलेल्या उत्कृष्ट कामकाजा बद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, या वेळी नवभारत चे संपादक निमिशजी माहेश्वरी उपस्थित होते.
ना.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले सहकाराचे मूळ, महाराष्ट्रात सुरुवातीलाच रुजले गेले, त्यामुळे वैभवशाली महाराष्ट्र घडविण्यात सहकाराचा मोठा वाटा आहे, सहकारामुळे समाजातील छोट्यात छोट्या वंचित घटकाला सामावले गेल्याने अनेकांचे संसार फुलले गेले आहेत.सहकार हा महाराष्ट्राच्या जीवनाचा एक भाग झाला असून यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेलं महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक धोरणाचे स्वप्न सहकाराने पूर्ण केल्याचे दिसत असल्याचे ना. थोरात यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात सहकाराने कार्यकर्ते घडविले, 1965 साल ते 1990 या 25 वर्षाच्या कालखंडात सहकार महाराष्ट्रात रुजला व भक्कम होऊन एक क्रांती घडवून आणली या दरम्यान सहकारी साखर कारखाने, दुधसंघ,पाणी पुरवठा योजना,सूतगिरण्या उभ्या राहिल्या आणि चांगल्या चालल्या, तसेच वित्त संस्थाच्या रूपाने सहकारी बँका, पतसंस्था उभ्या राहिल्या आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या उन्नती मध्ये सहकाराचा वाटा मोठा असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.
एकट्या दुकट्याने जे उभे केले जात नाही तेच एकत्र येऊन सहकाराच्या माध्यमातून चांगला उद्योग उभा राहू शकतो हे महाराष्ट्रातील लोकांनी अनुभवले आहे त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्य माणूसही उभा राहिल्याचे चित्र दिसत आहे,नवराष्ट्र ने सहकारात काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान सोहळा घेऊन एक वेगळा इतिहास निर्माण केला असल्याचे ही यावेळी ना.बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सहकार परिषदेचे उद्घाटन करण्यात आले या वेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास राज्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर,विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments