Breaking News

देशाचे भूषण असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतर संस्थांनी आदर्श घ्यावा - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

The Rayat Shikshan Sanstha, which is the Ideal of the country, should be followed by other institutions - Higher and Technical Education Minister Uday Samant

    सातारा  (जिमाका) : रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिकत आहेत. या शिक्षण संस्थेत काळाच्या गरजेनुसार कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासोबतच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांना रोजगारही उपलब्ध करुन दिला जात आहे. ही संस्था देशाचे भूषण असून या संस्थेचा आदर्श देशातील इतर संस्थांनी घ्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

    यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ यासन्स येथे रयत शिक्षण संस्थेचा 102 वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमास आमदार बाळाराम पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना श्री. सामंत म्हणाले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रातील काम अमुल्य असे आहे. या संस्थेत साडेचार लाखहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  संस्थेचे काम आदर्शवत असून संस्थेसाठी शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल

    देशातील विद्यार्थी बाहेरील देशातील विद्यापीठ पाहण्यासाठी, तेथे शिक्षण घेण्यासाठी जातात. भविष्यात रयत शिक्षण संस्था पाहण्यासाठी बाहेरील विद्यार्थी इथे येतील,  तसेच मुंबई, पुणे येथील विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

    यावेळी डॉ. पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन समाजाने दिलेल्या योगदानाचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जात आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जडण-घडणीत प्रबोधनकार ठाकरे यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. संस्थेकडून काळाच्या गरजेनुसार मुलांना शिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितले.

    श्री. सामंत यांच्या हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन व ई-रयत ॲपचा शुभारंभ करण्यात आला.

No comments