ज्येष्ठ नागरिकांचा योग्यप्रकारे सन्मान करा अन्यथा कायदेशीर मार्गाने त्यांचा सन्मान आणि हक्क अबाधीत - डॉ. शिवाजीराव जगताप
फलटण : भारतीय संस्कृतीने ज्येष्ठ नागरिकांना दिलेला सन्मान जतन करण्याची किंबहुना तो वृद्धिंगत करण्याची अपेक्षा असताना काही वेळा तो डावलण्याचे प्रसंग घडतात ते टाळून ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर मार्गाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि हक्क अबाधीत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाणे आणि शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप बोलत होते. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पोलीस उप निरीक्षक कदम, फेसकॉमचे आनंदराव शिंदे, सेवानिवृत्त संघटनेचे एस. वाय. खरात, बापूराव निकाळजे, अरुण पंचवाघ यांच्या सह शहर व तालुक्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी/सभासद उपस्थित होते.
जबाबदारी व कर्तव्य, हक्क व अधिकार आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये या बाबी विचारात घेतल्या तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान निश्चित अबाधीत राखता येईल, त्यासाठी कायदेशीर मार्गाने जाण्याची आवश्यकता नाही, तथापी अलीकडे हम दो, हमारे दो संस्कृतीचा पगडा वाढत असल्याने मी आणि माझे कुटुंब याचा मर्यादित अर्थ घेऊन केवळ बायको व मुले म्हणजे कुटुंब ही संकल्पना अधिक प्रभावी होत असून कुटुंबातील आजी - आजोबा, आई - वडील, भाऊ - बहीण, या नात्यांशी आपला संबंध नसल्याची भावना वाढीस लागत असल्याचे निदर्शनास आणून देत त्याला वेळीच पायबंद घालुन भारतीय संस्कृतीने सांगितल्या प्रमाणे सर्व नाती जपण्याची गरज असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.
पूर्वीच्या काळी उत्तम शेती, भरघोस उत्पन्न, दूध दुभते, मोठा वाडा त्यामध्ये वर वर्णन केल्याप्रमाणे सर्व नात्यातील कुटुंबीय आनंदाने रहात असत सणावाराला, लग्न प्रसंगात एकत्र येत त्यावेळी आणखी आनंदोत्सव साजरा केला जात असे, अलीकडे कुटुंबे वाढली मात्र शेतीचे क्षेत्र तेवढेच असल्याने वाढत्या कुटुंबात त्याचे तुकडे होत राहिले, परिणामी त्यावर कुटुंबाची गुजराण होणे अशक्य झाल्यानंतर शिकलेली मुले नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अन्यत्र स्थिरावली, तेथे त्यांचे स्वतंत्र कुटुंब निर्माण झाले. वर्षानुवर्षे एकमेकांपासून दूर राहिल्याने एकी, आपुलकी, इतरांचा मान सन्मान याबाबी नकळत बाजूला पडल्या असल्याने त्यातून कुटुंबातील ज्येष्ठांची हेळसांड अनवधनाने घडत असेल तर ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा न झाला तर कायद्याचे संरक्षण निश्चित असल्याचे डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
स्वकष्टार्जित चल - अचल संपत्ती कोणाला द्यावी याचा सर्वस्वी अधिकार मालमत्ता धारकाचा असल्याने वृद्धापकाळात जे त्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करतील त्यांना ते आपली मालमत्ता बहाल करु शकतात, त्याचप्रमाणे कायद्याचा विचार करता मालमत्ता असो वा नसो मुलांना आई - वडिलांचा सांभाळ करावाच लागेल, अन्यथा कायदेशीर मार्गाने पोटगी स्वरुपात रक्कम त्यांच्याकडून वसूल करता येते तथापी कायदेशीर मार्गाने आपले हक्क मागणारांची संख्या अत्यल्प असल्याचे प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळावा यासाठी केंद्र शासनाने सन २००७ मध्ये स्वतंत्र कायदा केला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरापर्यंत व्यवस्था असल्याचे निदर्शनास आणून देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी केले.
फेसकॉमचे आनंदराव शिंदे, घनवट, स. रा. मोहिते गुरुजी वगैरेंची भाषणे झाली.
प्रारंभी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन सर्वांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पोलीस उप निरीक्षक कदम यांनी सर्व उपस्थितांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. पोलीस पाटील सौ. रसिका भोसले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
No comments