विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा उपयोग देश व समाजासाठी करावा : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चर व कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा प्रतिकात्मक पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करुन पदवी प्राप्त केली आहे, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी देश व समाजासाठी करावा आणि आपली व कुटुंबाची प्रगती साधावी असे आवाहन करीत फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोविड-१९ च्या प्रार्दुभावामूळे विद्यापीठाने पदवी प्रदान कार्यक्रम महाविद्यालय स्तरावर आयोजित करण्यास सांगितले होते. फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ ३५ वा प्रतिकात्मक पदवी प्रदान कार्यक्रम नुकताच समारंभपूर्वक संपन्न झाला. त्यावेळी समारंभाच्या अध्यक्षपदावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सोसायटी नियामक मंडळ सदस्य शरदराव रणवरे, शिरिष दोशी, महाविद्यालय समितीचे सदस्य आर. एच. पवार, रामदास कदम, फलटण एज्युकेशन सोसायटी प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विद्यापीठाच्या निर्देशानुसार प्रथम दहा विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले. सूत्रसंचालन प्रा. ए. एस. रासकर यांनी केले.
प्रा. डी. जे. फडतरे, प्रा. आर. डी. नायकवडी, प्रा. व्ही. वाय. सुळे, अमोल इतराज, श्रीमंत खरात, रणजित निंबाळकर, प्रीतम भगत यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments