कृष्णानगरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गाळेधारक, रहिवाश्यांचे पुनर्वसन करूनच जागा घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आमदार महेश शिंदे यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीवर निर्देश
मुंबई - सातारा जिल्ह्यातील कृष्णानगर येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरील गाळेधारकांचे तसेच रहिवाश्यांचे, शाळेचे पूनर्वसन करूनच जमीन उपलब्ध करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी याबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन गाळेधारक, रहिवाशी तसेच शाळेबाबतची वस्तुस्थिती मांडली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त निर्देश दिले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदार संघातील कृष्णानगर येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येथील गाळेधारक व्यावसायिक, शाळा तसेच रहिवाश्यांना हटविण्याची कार्यवाही सुरु केली होती. त्याबाबत आमदार श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर वस्तुस्थिती मांडली. त्यावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी या गाळेधारक व्यावसायीक, रहिवाशांचे तसेच येथील शाळेचे पुनर्वसन करूनच जागा उपलब्ध करून घेण्यात यावेत, असे निर्देश दिले. विशेषतः या ठिकाणच्या शाळेलाही जलसंपदा विभागाची जमीन देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी आणि पालकांनाही दिलासा मिळेल अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते.
No comments