मुरूम येथे तलवार व सत्तुराने हल्ला ; 10 जणांवर गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : तलवारी पोत्यातून बाहेर काढत असतानाचे शुटींग मोबाईलमध्ये केली असल्याचा समज करून घेऊन, मुरूम ता. फलटण येथील १० जणांनी मिळून, एकास तलवार व सत्तुरसारख्या हत्याराने डोक्यात वार करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष पोपटराव बोंद्रे रा. मुरूम ता. फलटण हे लक्ष्मीनगर, मुरूम मधील अमोल काशीद यांच्या घरासमोर बुलेट मोटार सायकल पार्क करुन लक्ष्मीनगरकडे निघाले होते, त्यावेळी सुरज वसंत बोडरे, प्रणित बोडरे, उमेश खोमणे, शिवाजी खोमणे, नवनाथ खोमणे, किरण खोमणे, राहुल भंडलकर, अंकुश भंडलकर, चंद्रकांत खोमणे, संभाजी खोमणे सर्व रा.मुरूम ता फलटण जिल्हा सातारा हे सर्व त्यांच्या 5-6 मोटार सायकली रस्त्याच्याकडेला लावुन उभे होते. त्यांच्यातील प्रणित बोडरे हा त्याचेकडील एका पोत्यातून तलवारी व सत्तुरसारखी हत्यारे खाली जमीनीवर टाकत होता. ही बाब सुभाष पोपटराव बोंद्रे हे पाहत लक्ष्मीनगरकडे चालत जात असताना, प्रणित बोडरे याने त्याच्यासोबतच्या लोकांना मोठ्याने ओरडुन सांगितले की, सुभाष बोंद्रे, त्यांचे तलवारी पोत्यातून बाहेर काढत असतानाचे शुटींग मोबाईलमध्ये केले आहे. त्यामुळे त्यासर्वांनी प्रणित बोडरे याने खाली टाकलेल्या तलवारी व सत्तुर घेऊन, सुभाष बोंद्रे यांना तलवार व सत्तुरसारख्या हत्याराने डोक्यात वार करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी. पी. दराडे हे करीत आहेत.
No comments