Breaking News

१०० टक्के कोविड लसीकरण विशेष मोहिम

100% Covid Vaccination Special Campaign

     फलटण   : फलटण शहर व  तालुक्यात कोविड लसीकरण १०० टक्के  पूर्ण करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविण्यात येत असून ज्यांनी अद्याप लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.

     फलटण पंचायत समिती सभागृहात झालेल्या लसीकरण आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकाऱ्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले असून आरोग्य खात्यासह सर्व संबंधीत यंत्रणांना सर्वेक्षण करुन लसीकरण न केलेल्या लोकांना भेटून लसीकरणाबाबत पुन्हा एकदा आवाहन करण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार, नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे,  बालविकास प्रकल्प अधिकारी कोळेकर, इंगळे, गट शिक्षणाधिकारी रमेश गंबरे, सर्व प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, गट प्रवर्तक यांच्या सह संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

       आज पर्यंत विविध मार्गांनी जनजागृती व आवाहन करुनही काही लोक लसीकरण घेण्याचे बाकी आहेत किंवा लस घेण्यास तयार नाहीत त्यांना लस घेण्यासाठी आणखी एकदा लसीकरणाचे महत्त्व सांगून आवाहन  करायचे आहे तरी देखील लस घेण्यास नकार देत असतील तर याबाबतचे लेखी  आरोग्य विभागा कडील प्रपत्रातील यादी वर लस घेण्यास नकार किंवा इतर काही कारण असेल तर नमूद करुन संबंधीत लाभार्थी व्यक्तीची स्वाक्षरी /अंगठ्याचा ठसा घ्यावयाचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

     बालविकास प्रकल्प अधिकारी,  फलटण यांनी १०० % लसीकरण मोहिम बाबत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सूचना देवून वरीलप्रमाणे सर्वेक्षण कामी सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले, मंगळवार दि. ९ नोव्हेंबर पासून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत नेमून दिलेल्या अंगणवाडी क्षेत्रात लसीकरण सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाला पूर्णपणे सहकार्य करतील असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले.

No comments