Breaking News

संविधानामुळे देशातील करोडो जनतेला न्याय मिळाला : ज्येष्ठ विचारवंत व प्राध्यापक प्रा.हरी नरके

Millions of people got justice due to constitution: Prof. Hari Narke

    मुंबई  - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे  त्याकाळातील जगातील सर्वश्रेष्ठ संविधान तज्ज्ञ  होते.  संविधान सभांद्वारे जनतेच्या सूचना स्वीकारण्यात आल्या व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान जनतेला बहाल केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांचे अनन्यसाधारण योगदान या देशातील जनतेच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासात आहे. आयुष्यभर त्यांनी शोषित, वंचित व  उपेक्षित समाजाला न्याय दिला, असे मत ज्येष्ठ विचारवंत व प्राध्यापक हरी नरके यांनी व्यक्त केले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आयोजित बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथील कार्यक्रमात  भारतीय संविधान दिनानिमित्त ‘भारताचे  संविधान आणि 21 व्या शतकातील भारताची वाटचाल’ या विषयावर प्राध्यापक हरी नरके बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक  धम्मज्योती गजभिये हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ. राजीव चव्हाण, यशदा प्रकाशन विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, समाजकल्याण सह आयुक्त  प्रशांत चव्हाण मान्यवर उपस्थित होते.

    प्रा. हरी नरके म्हणाले की, जगातील लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनामध्ये  भारताची राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जी  मूलतत्त्वे आहेत ती इतर राष्ट्रांच्या घटनेमध्ये त्यांचा अभाव दिसतो. भारतीय राज्यघटना लवचीक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये म्हणाले की, संविधानामुळेच राजकारण, अर्थकारण, न्यायव्यवस्था, प्रशासन चालत असते. संविधानाने भारतीयांना न्याय दिला. संविधान हे सुदृढ समाज व्यवस्थेसाठी ऑक्सिजन आहे. आपल्याला पुरोगामी वारसा लाभला असून संविधान जगात सर्वश्रेष्ठ असूनही गेल्या सत्तर वर्षात अनेक समाज बांधव वंचित राहिले आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी. तसेच राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी व संपूर्ण जनतेला दिशा देण्याचे काम बार्टी संस्था करत असून बार्टीच्या विविध योजना व उपक्रम, संविधान जनजागृतीचे कार्य बार्टीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. वंचित घटकांना न्याय देण्याचे काम बार्टी करत आहे.

    प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान नियंत्रक रक्षा लेखा डॉ.राजीव चव्हाण,  डॉ.बबन जोगदंड यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत मा.महासंचालक यांनी संविधनाची प्रत भेट देऊन केले.

No comments