शेतकऱ्यांचे आयुष्य कसं सोईस्कर व सोपे होईल यावर लक्ष ; युवकांसाठी स्पोकन इंग्लिश व उद्योग निर्मिती - श्रीमंत विश्वजितराजे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० नोव्हेंबर - फलटण तालुक्यातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे, शेतकऱ्यांचे आयुष्य कसं सोईस्कर व सोपे होईल याकडे मी लक्ष देणार आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा पूर्ण लाभ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. फलटण तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांध्यावर जावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच तालुक्यातील युवा वर्गासाठी स्पोकन इंग्लिशचे क्लासेस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच तालुक्यातच जास्तीत जास्त उद्योग निर्मिती करून युवकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाल्यानंतर श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील जयव्हिला या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्रीमंत विश्वजितराजे बोलत होते. यावेळी फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून पुढील काळामध्ये कशा प्रकारे वाटचाल सुरु राहणार आहे. याबाबत श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी आपले मत व्यक्त केले. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रियताई सुळे, विधान परिषद सभापति श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या नेत्तृत्वाखाली काम करीत राहीन व राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा वाढवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन अशी ग्वाही श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
युवकांच्या विनंतीला मान देऊन, पूर्ण अभ्यासांती सभापती पद स्वीकारले
काही वर्षांपूर्वी सुद्धा तालुक्यातील कार्यकर्ते मला सभापती पद मिळावे यासाठी आग्रही होते. सभापतिपद घेण्याची संधीही मला येऊन गेली परंतु कुठल्याही गोष्टीला हात घालण्यापूर्वी त्या गोष्टीचा अभ्यास असेल तरच, मी त्या कामात हात घालत असतो, अन्यथा त्याचा अभ्यास करूनच मग पुढे पाऊल उचलत असतो, आज मी युवकांच्या, कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन, पूर्ण अभ्यासांती पंचायत समितीचे सभापती पद स्वीकारले असल्याचे श्रीमंत विश्वजीतराजे यांनी सांगितले.
रामराजे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मला जे शिकवलं, त्याप्रमाणे मी पुढे वाटचाल करणार आहे. फलटण तालुका हा ग्रामीण भाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हा भाग दुष्काळी होता, परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या भागात पाणी आणून हा भाग बागायती केलेला आहे, फलटण तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेत्तृत्वाखाली सन १९९१ पासून विकासकामे सुरु आहेत, पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न सुटलेला आहे, आगामी काळामध्येही याच पद्धतीने विकास सुरु ठेवणार असल्याचे श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
शेती - रोजगार - शिक्षण यावर लक्ष
फलटण तालुक्यामधील युवकांना ते हुशार असूनही, रोजगरनिमित्ताने बाहेर गेल्यानंतर इंग्लिश बोलण्याची येत असणारा अडचण लक्षात घेऊन, स्पोकन इंग्लिश कोर्स सुरु करणार आहे. फलटण तालुक्यातील युवकांना फलटण तालुक्यामध्येच रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या माध्यमातून कार्यरत राहणार आहे. फलटण फलटण तालुक्यामध्येच रोजगार दिल्यानंतर मुले आपल्या आई-वडिलां समवेतच घरी राहून व्यवसाय - रोजगार करतील यावर लक्ष केंद्रित करणार आहे. जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळांची सुधारणा करण्यावर भर देणार असल्याचे श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासकीय योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न
जनतेची सेवा करायची ही विचारधारा घेऊनच मी फलटणला आलो, पंचायत समितीच्या माध्यमातून भरपूर विकास कामे होऊ शकतात पंचायत समिती ही एक शेतकऱ्यांशी संबंधित असणारी संस्था आहे, यामध्ये अनेक गोष्टी करू शकतोय, शासनाने आणलेल्या योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आयुष्य कसे सोपे आणि सोईस्कर होईल याकडे जास्त लक्ष देणार आहे. फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न माहिती करून घेण्यासाठी तालुका दौऱ्याचे आयोजन हे आगामी काही दिवसामध्ये करणार असल्याचेही श्रीमंत विश्वजीत राजे यांनी स्पष्ट केले.
पंचायत समिती मध्ये अटीतटीचे राजकारण चालु देणार नाही
काही काही वेळेला योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना व्यवस्थित फॉर्म भरता येत नाही, कागदपत्रांची पूर्ण माहिती नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योजनांचा लाभ आणून देणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण जबाबदारीने पार पाडणार आहे. पंचायत समिती मधील अटीतटीचे राजकारण चालु देणार नाही, पंचायत समितीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कामे तातडीने कशी केली जातील याकडे पूर्ण लक्ष देणार असल्याचेही श्रीमंत विश्वजितराजे यांनी सांगितले
पंचायत समितीचा नावलौकिक राज्यभर वाढवणार
फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या प्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून कार्यरत आहे व राज्यात मॉडेल म्हणून नावारूपास आली त्याच प्रमाणे फलटण पंचायत समिती सुद्धा शेतकरी वर्ग व युवा वर्ग यांना केंद्रस्थानी ठेवूनच कार्यरत राहणार आहे. फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून आगामी काळामध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून फलटण पंचायत समितीचा नावलौकिक राज्यभर वाढवणार असल्याची ग्वाही सुद्धा श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
No comments