फलटणच्या विद्यर्थिनीने गुणवत्तेवर सैनिक स्कूल मध्ये मिळविला प्रवेश
The Phaltan student got admission in Sainik School on merit
फलटण : सैनिक स्कूल, सातारा येथे शिक्षणासाठी मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यानंतर पहिल्याच तुकडीत फलटण येथील विद्यार्थिनीने गुणवत्तेवर जागा पटकात फलटणच्या नावलौकिकात भर घातली आहे.
माझेरी, ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेतील सिद्धी संदीप गंगतीरे या विद्यार्थिनीने देश पातळीवरील परीक्षेत २३७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावत आपला प्रवेश अधोरेखित केला आहे. या उज्वल यशाबद्दल अनुबंध संस्थेच्यावतीने श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, निवृत्त प्राचार्य रवींद्र येवले, अरुण भोईटे वगैरे मान्यवरांच्या हस्ते कु. सिद्धी गंगतीरे हिचा यथोचित सन्मान करुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
कोरोना कालावधीत शाळा बंद असतानाही सतत अभ्यासात व्यग्र राहुन ग्रामीण भागात, जिल्हा परिषद प्रा. शाळेतील विद्यार्थिनीने मिळविलेले यश निश्चित प्रेरणादायी असल्याचे सांगत श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी कु. सिद्धी गंगतीरे या विद्यार्थिनीला तिच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कु. सिद्धीचे वडील प्रा. शिक्षक असल्याने त्यांचे तसेच माझेरी प्रा. शाळेतील शिक्षक सर्वश्री भोलचंद बरकडे, गणेश पोमणे, विकास भगत यांचे उत्तम मार्गदर्शन तिला लाभले.
सातारा येथील या सैनिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वी नंतर प्रवेश देण्यात येत असून इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा येथे उपलब्ध आहे. ६२५ विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
दर्जेदार शिक्षणाची परंपरा सतत जपलेल्या या सैनिक स्कूल मधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी पुढे सैन्य दलातील विविध विभागाच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य देवून पुढील शिक्षण घेतात, एन. डी. ए. कडे जाणारे विद्यार्थी अधिक असतात.
या वर्षी प्रथमच इयत्ता ६ वी नंतरच्या शिक्षणासाठी देशाच्या विविध प्रांतातील १० विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यानंतर घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत महाराष्ट्रातील ८ आणि बिहार व प. बंगाल मधील प्रत्येकी एक अशा एकूण १० विद्यार्थिनींनी उज्वल यश प्राप्त करुन आपला प्रवेश निश्चित केला आहे.
प्रवेश परीक्षेद्वारे सैनिक स्कूल सातारा मध्ये प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थिनीमध्ये सर्वाधिक २४६ गुण मिळवून पियुषा जितेंद्र चव्हाण या सातारा येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर २३७ गुण मिळवून फलटणच्या सिद्धी संदीप गंगतीरे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे, २३४ गुण मिळवून पुण्याच्या श्रावणी दीपक वाघ या विद्यार्थीनीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सिद्धी रोहन रावखंडे या सातारच्या विद्यार्थिनीने २१४ गुण, अनिष्का शामराव ननावरे या सातारच्या विद्यार्थिनीने २०२, उत्तरा भोवळ या रायगडच्या विद्यार्थिनीने १९३, आदिती कश्यप या पुण्यात असलेल्या मात्र मूळ बिहारच्या विद्यार्थिनीने १७६, रिया महेंद्र धोडी या पालघरच्या विद्यार्थिनीने १७२, तोतावर यज्ञ शंकर या लातूरच्या विद्यार्थिनीने १३८, ईशा कुमारी या सध्या रायगड मात्र मूळ प. बंगालच्या विद्यार्थीनीने सातारा सैनिक स्कूल मध्ये प्रवेश मिळविला आहे.
No comments