Breaking News

पालखी मार्गावर तरडगांव येथे प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधा उभारुन पायलट प्रोजेक्ट करावा - खासदार रणजितसिंह

Pilot project should be done by setting up primary and essential facilities at Tardgaon on Palkhi Marg - MP Ranjitsinh

     फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ नोव्हेंबर -  आळंदी - पंढरपूर महामार्ग क्र. ९६५ वरून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी, तरडगाव हद्दीत सात किलोमीटर परिसरात प्राथमिक आणि अत्यावश्यक सुविधा उभारणी करण्यासाठी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुला  वृक्ष लागवड करून, वृक्ष संवर्धन  करण्यास स्थानिक संस्था, शेतकरी, एनजीओ सहकार्य करण्यास तयार आहेत. या परिसरात दोन मजली सार्वजनिक स्वच्छतागृह सोय करून त्याच्या शेजारी आंघोळीची व्यवस्था करता येणे शक्य आहे,  तसा आर्किटेक्चरचा प्रकल्प आपल्या योजनेत समाविष्ट करावा त्याकरीता स्थानिक पातळीवर संपूर्ण सहकार्य करण्यास स्थानिक तयार असल्याचे पत्र केंद्रीय रस्ते व वाहतूक परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना देऊन सदरचा पायलट प्रोजेक्ट करावा अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. 

    फलटण नगर परिषदेचे गटनेते व आध्यत्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव व वारकरी संघटनेचे पदाधिकारी श्री बबनराव निकम भाऊ, केशवराव जाधव महाराज, घनवट साहेब, काटकर साहेब, तसेच माऊली चॅरिटेबल ट्रस्ट चे दिलीप बापू गायकवाड, सुदाम राव अडसूळ, सतीश गायकवाड, पंकज गायकवाड व भाजपा चे पदाधिकारी अतुल गायकवाड, झुंजार आण्णा व तरडगाव येथील ग्रामस्थ यांच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंढरपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना  निवेदन देऊन वरील मागणी केली आहे. 

     केंद्रीय रस्ते व वाहतूक परिवहन मंत्री नितिन गडकरी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आळंदी पंढरपूर महामार्ग क्र. ९६५ हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वारकऱ्यांचा पायी चालण्याचा मार्ग आहे. या मार्गावर जेथे जेथे माऊलींची पालखी मुक्कामी असते अशा छोट्या गावांमध्ये वारकऱ्यांची गैरसोय दूर होणेकरिता प्राथमिक सुविधा म्हणून काही अत्यावश्यक गोष्टी उभारणे गरजेचे आहे.

    सदर महामार्गावर १) पिण्याचे आणि वापराचे पाणी २) अन्न ३) मलमूत्र विसर्जन ४) रस्त्याच्या दोन्ही बाजुला आवश्यक असणारे वृक्ष लागवड. या प्रमुख गरजांपैकी अन्नाची गरज प्रत्येक गावकरी आनंदाने पुरवत असतात. त्यापैकी क्रमांक ३ ची मलमूत्र विसर्जन व्यवस्थापन ही खूपच महत्त्वाची गरज आहे. त्याकरिता स्थानिक लोकसहभागसुद्धा महत्त्वाचा असून सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये या गरजेवर विचार होणे अत्यंत आवश्यक ठरते.

    सातारा जिल्ह्यातील लोणंद ते तरडगांव येथे चांदोबाचा लिंब येथे माऊलीचे पहिले उभे रिंगण होते. या परिसरातच ग्रामपंचायत तरडगांव या गावामधून सुमारे (कि.मि. १११ ते ११८) ७ कि.मी. पालखी मार्ग जातो. सदर मार्गावर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन झाल्या आहेत त्यांच्या सहभागातून पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूस लिंबाची झाडे (कडूनिंब ) लावून दर ५ झाडांमध्ये लाल गुलमोहर व पिवळा बहावा अशी वृक्ष लागवड करण्याचा व सदर वृक्ष लागवडीला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था स्वतः शेतकरी व ग्रामपंचायत तरडगांव व माऊली सामाजिक व शैक्षणिक संस्था सहकार्य करण्यास तयार आहेत. सदर कामी खर्चाची व नियोजनाची आपल्या प्रकल्पांतर्गत असणारी तरतूद स्थानिक संस्थांकडे वर्ग केल्यास प्रकल्पाला अजून बळकटी मिळेल.

    सध्याच्या महामारीच्या परिस्थितीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने मलमूत्र विसर्जन व्यवस्था हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याकरिता तरडगांव हद्दीमध्ये १० किलोमीटरवर १/२ या प्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारण ४०-५० युनिट असणारे दोन मजली सार्वजनिक स्वच्छतागृहाचे आकर्षक मनोरे व त्या बाजूला आंघोळीची व्यवस्था करता येणे शक्य आहे. तसा आर्किटेक्चरचा प्रकल्प आपल्या योजनेत समाविष्ट करावा त्याकरिता स्थानिक पातळीवर संपूर्ण सहकार्य करण्यास स्थानिक तयार आहे. तरी वरील प्रकल्प आळंदी - पंढरपूर क्र. ९६५ मार्गाच्या तरडगांव हद्दीमध्ये ७ किलोमीटर परिसरामध्ये राबवण्यास आपण मान्यता द्यावी ही विनंती. 

No comments