सातार्याच्या प्रियांका मोहिते यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा) १४ नोव्हेंबर - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या सातार्याच्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले. अन्नपूर्णा शिखरवर चढणारी प्रथम भारतीय महिला कुमारी मोहिते या आहेत. यासह अन्य शिखरावर ही त्यांनी चढाई केलेली आहे.
प्रियांका मोहिते ही एक भारतीय गिर्यारोहक असून तिचा जन्म 30 नोव्हेंबर 1992 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. 2013 मध्ये जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट (8,848 मी) शिखर सर करणारी प्रियांका ही महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुलगी ठरली. प्रियांकाने २०१६ मध्ये आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किलिमांजारो (५,८९५ मीटर) देखील जिंकले होते जे टांझानिया प्रदेशात आहे. दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, तिने 2018 मध्ये माऊंट ल्होत्से (8,516 मी) यशस्वीपणे शिखर सर केले. 2019 मध्ये, माकालू (8,485 मीटर) शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
16 एप्रिल 2021 रोजी प्रियांका जगातल्या या सर्वात खडतर अन्नपूर्णा पर्वतशिखरावर यशस्वी चढाई करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. अन्नपूर्णा-1 हे हिमालयाच्या अन्नपूर्णा रांगेतलं मुख्य शिखर हे 8,091 मीटर किंवा 26,545 फूट उंचीचं आहे. उंचीच्या मानानं हे जगातलं दहाव्या क्रमांकाचं शिखर असलं, तरी चढाईसाठी ते जगात सर्वात कठीण मानलं जातं.
No comments