Breaking News

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक : फलटण मतदान केंद्रावर ९५.६५ % मतदान

Satara District Central Co-operative Bank Board of Directors Election: 95.65% Polling at Phaltan Polling Station

     फलटण दि. २१ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज रविवारी मतदान झाले असून येथील मुधोजी हायस्कुल मतदान केंद्रावर फलटण तालुक्यातील २७६ पैकी २६४ म्हणजे ९५.६५ % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित १२ मतदारांपैकी काही मयत असून काही जण वृद्धत्वामुळे, काहीजण रुग्णालयात उपचार घेत असल्याने तर काही अन्य कारणाने मतदानास येऊ शकले नाहीत.

    फलटण येथे सोसायटी मतदार संघातील १३१ पैकी १२९, प्रक्रिया मतदार संघातील सर्व ७, खरेदी विक्री संघ मतदार संघातील १, नागरी बँका पतसंस्था मतदार संघातील ५५ पैकी ५४, गृहनिर्माण मतदार संघातील सर्व १३, औद्योगिक, विणकर, मजूर, व्यक्तिगत मतदार संघातील ६९ पैकी ६० अशा एकूण २७६ पैकी २६४ म्हणजे ९५.६५ % मतदारांनी फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला.

     महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सोसायटी मतदार संघातून यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत, त्यांनी आज ४ ठिकाणाहुन प्रतिनिधीत्व करीत असल्याने ४ वेळा मतदान केले, आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत राजसिंहराजे तथा बंटीराजे खर्डेकर यांनी मतदान केले. प्रक्रिया मतदार संघातून यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेले विद्यमान संचालक श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांनी ३ वेळा, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी संचालकांसह मतदारांनी मतदान केले.

       सातारा जिल्हा परिषद महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम ह्या महिला मतदार संघातून निवडणूक लढवीत असून त्यांनी मुधोजी हायस्कुल मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

      सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) फलटण सुनील धायगुडे यांनी फलटण - खंडाळा दोन मतदार संघात क्षेत्रीय अधिकारी म्हणून तर फलटणच्या सहकार अधिकारी श्रीमती कुलकर्णी यांनी फलटण येथे केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले.

    आज जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली असून मंगळवार दि. २३ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संचालक मंडळावरील २१ पैकी ११ जागांची निवड बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित १० जागांसाठी आज मतदान झाले.

    फलटण येथील मतदान केंद्रावर संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

No comments