विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्रीमंत रामराजे यांचा सत्कार
फलटण : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करुन त्यांना पांडुरंगाचा प्रसाद देण्यात आला.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहोळा प्रसंगी देवदेवतांसह उपस्थित राहिलेल्या पांडुरंगाने या समाधी सोहोल्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे त्यावेळी पांडुरंगाने मान्य केल्याच्या श्रद्धेतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने गेली काही वर्षे प्रत्येक वर्षी पंढरपूर - आळंदी असा रथ सोहोळा काढण्यात येतो. यावर्षी सोहोळा फलटण येथे असताना ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर आणि समितीचे व्यवस्थापक व सोहोळा प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेवून त्यांचा समितीच्यावतीने यथोचित सत्कार केला.
सोहोळ्यात रथामध्ये पांडुरंगाच्या पादुका ठेवण्यात येत असून मार्गशीर्ष शु|| १५ पौर्णिमा ते मार्गशीर्ष वद्य ८ अष्टमी असा हा सोहोळा गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर ते आळंदी मार्गक्रमण करतो, त्यावेळी सोहोळ्याचा एक दिवस फलटण येथे मुक्काम असतो. रथापुढे १४ व रथामागे ९ अशा एकूण २३ दिंड्यांमध्ये सुमारे २५०० ते ३००० लोक सहभागी होतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले.
सोहोळा रात्रीच्या मुक्कामासाठी येथील मालोजीराजे शेती शाळेच्या प्रांगणात विसावला होता, तेथून सकाळी मार्गस्थ होऊन लोणंद मुक्कामी रवाना झाला, त्यावेळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाताना माऊलींच्या सोहोळ्यास आळंदी ते पंढरपूर या अंतरासाठी १५ दिवस मिळतात, मात्र आमच्या सोहोळ्यास तेच अंतर पार करण्यासाठी केवळ ८/९ दिवस मिळत असल्याने धावपळ व दमछाक होत असल्याने पुढील वर्षाचे नियोजन करताना याबाबत सर्वांशी बोलून फेर नियोजन करण्याचे सूतोवाच ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांनी केले आहे.
No comments