राज्य सहकारी बॅंक : सामान्य माणसाला स्वबळावर उभे करणारे शक्ती केंद्र- शरद पवार
मुंबई, दि. 11 : राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा 110 वा शतकोत्तर दशपूर्ती सोहळा केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. या सोहळ्याला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील जिल्हा बँकांचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार श्री.पवार म्हणाले, राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी या राज्य सहकारी बँकेने मोठे योगदान दिलेले आहे. बँकेचा 11 दशकांचा प्रवास हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचे पान आहे. वैकुंठभाई मेहता, विठठ्लदास ठाकरसी, धनंजय गाडगीळ हे बँकिंग क्षेत्राशी बांधिलकी असणारे आणि या क्षेत्रातील कर्तृत्ववान अशा या व्यक्ती आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे सहकार क्षेत्रात योगदान आहे. अनेक संस्था या बँकेमार्फत राज्यात उभ्या राहिल्या आहेत. मधल्या काळात बँकेची परिस्थिती पाहता सहकार क्षेत्राला चिंता वाटावी असे चित्र निर्माण झाले. मात्र आता राज्य सहकारी बँकेत लक्षणीय बदल झाला आहे. ही बँक सुदृढ होणे म्हणजेच राज्यातील सहकार सुदृढ होणे आहे. याचाच अर्थ राज्यातील शेवटच्या माणसाला स्वबळावर उभे करण्यासाठी एक शक्तीकेंद्र म्हणून बँक काम करत आहे. त्यामुळे या बँकेच्या उभारणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा व्यक्तींची तैलचित्रे इथे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नव्या पिढीला या सर्वांची ओळख या माध्यमातून होईल. या तैलचित्रांसोबतच त्यांच्या योगदानाचे टिपणही आवश्यक आहे. बँकेची ही उत्तम वाटचाल पाहता लोकांच्या दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास श्री.पवार यांनी व्यक्त केला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील विकासाचा अनुभव आपण घेतला आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची मुहुर्तमेढ करणाऱ्या व्यक्तिंच्या तैलचित्राचे अनावरण ही अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे मुल्यमापन केल्यास ग्रामीण जनजीवनातील घडलेले सामाजिक आणि आर्थिक बदल यातून सहकारातील दृष्टीकोन लक्षात येईल. देशाच्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्रात 22 ते 24 टक्के, सेवाक्षेत्रात 25 ते 54 टक्के आणि कृषी क्षेत्रात 8 ते 12 टक्केच योगदान राज्यांचे आहे. कृषी क्षेत्रातील योगदान वाढण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळात गरिबी, भूकबळी आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर होती. त्या जनतेला आर्थिक सक्षम, समृद्ध करण्याकरिता सहकाराचा विचार देशाला मिळाला. देशात 115 जिल्ह्यांचा विकासदर कमी असून त्या ठिकाणी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासलेपणा आहे. येथील दरडोई उत्पन्न, विकास दर आणि कृषी विकास दर नगण्य असल्यामुळे देशाच्या विकासदराचा उच्चांक गाठण्यात अडचणी येत आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणि परिवर्तन घडवून आणणे हेच सहकार चळवळीचे यश मानले जाईल.
सहकार चळवळीला नवीन दृष्टीकोन देण्याची गरज आहे. वैशिष्ट्ये जोपासून काळानुरुप बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी उपलब्ध ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यास महाराष्ट्र आणि देशाचे रुप पालटेल, असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.
बँकेचे पहिले संस्थापक, संचालकांच्या स्मृतींना उजाळा देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, 110 वर्षांच्या मोठ्या कालखंडाची परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही सर्व जिल्हा बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. विकास सोसायट्या, जिल्हा बँका आणि राज्य सहकारी बँका यांच्या माध्यमातून कर्जपुरवठा केला जातो. महाराष्ट्राच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा फार मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडविण्यात या बँकेचे योगदान मोठे आहे. अलिकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आत्मसात करुन पुढे जात असताना भविष्यात या बँकेच्या माध्यमातून राज्यातील विकास सोसायट्या, जिल्हा बँका आणि नाबार्डच्या माध्यमातून संगणकीकरण करण्याचे आव्हान सर्वांपुढे आहे.राज्य सहकारी बँकेच्या पाठीशी शासन नेहमीच असेल, भविष्यात चांगले काम नक्कीच घडेल. राज्याच्या आर्थिक विकासामध्ये राज्य सहकारी बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहकार चळवळीचे मोलाचे योगदान देणारे सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा.धनंजय गाडगीळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या तैलचित्राचे अनावरण तसेच सर विठ्ठलदास ठाकरसी यांचे नातू सुधीर ठाकरसी आणि तैलचित्रकार विलास चोरमले यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी तर आभार व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी मानले.
No comments