Breaking News

महाज्योतीच्या मोफत टॅब व प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे - मिलिंद नेवसे

मोफत टॅब व ऑनलाईन प्रशिक्षणाची माहिती व अर्ज विद्यार्थ्यांना देताना राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे,  राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे,  नगरसेवक अजय माळवे 

Students should take advantage of Mahajyoti's free tab and online training - Milind Nevese

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ नोव्हेंबर -  महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती द्वारा ११ वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या, ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब व ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तकें विद्यार्थ्यांना मोफत घरपोच दिली जातील. विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी महाज्योतीकडे करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२९ ही अंतिम तारीख आहे. तरी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या या योजनेचा फायदा घ्यावा व उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी केले.

    महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाज्योती कडून ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी  मोफत टॅब वितरण व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी  काँग्रेसच्या ओबीसी  सेलच्या माध्यमातून त्यासंदर्भातील फार्म भरून घेतले जात आहेत. या अनुषंगाने, दि.१२ नोव्हेंबर रोजी,  श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मिलिंद नेवसे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे, नगरसेवक अजय माळवे, प्राचार्य कोळेकर सर, उपप्राचार्य वेदपठाक सर,  उपमुख्याध्यापक अहिवळे सर उपस्थित होते.

     महाराष्ट्र शासन, महाज्योती कडून मोफत टॅब वितरण व मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असणाऱ्या अभियानाचे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, आ.दिपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाभर कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे व त्यासंदर्भातील फार्म भरून घेतले जात असल्याचे मिलिंद नेवसे यांनी यावेळी सांगितले. 

    महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती तर्फे राबविण्यात आलेल्या ही योजना अत्यंत चांगली आहे.  कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती बदलली आहे, सर्वसामान्यांना महागडे मोबाईल व कोचिंग क्लास लावता येत नाहीत. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या वतीने ही योजना आणली आहे.  विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मिलिंद नेवसे यांनी केले.

        ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या वतीने, मोफत आनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅब देत आहे, शासनाचा हा उपक्रम  समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम, श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे कोरोना काळात ऑनलाईन प्रशिक्षण घेता आले नाही,  शासनाच्या महाज्योती तर्फे ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी यावेळी केले.

    महाज्योतीच्या वतीने मोफत आनलाईन प्रशिक्षण देण्यात येत असून विद्यार्थ्यांना मोफत टॅब पुरवले जात आहेत, याचा लाभ घेण्यासाठी या विद्यार्थ्यांना वर्ग १० वी मध्ये शहरी विभाग ७०% व ग्रामीण भाग ६०% मार्क्स असणे आवश्यक आहे, तसेच नॉन क्रिमीलेयर, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी विद्यार्थ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर पूर्वी आपले अर्ज  भरून घ्यावेत असे आवाहन प्राचार्य कोळेकर सर यांनी केले.

    कार्यक्रमास शिक्षक,  पत्रकार विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  आभार उपप्राचार्य वेदपठाक सर यांनी मानले.

No comments