फलटणच्या डीएड चौकात ऊसाने भरलेली ट्रॉलीचा थरार
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) ९ नोव्हेंबर - साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरवात झाली मात्र शहरातील ऊस वाहतूक वाढल्याने, रस्त्यावरील धोका वाढला आहे. याचा प्रत्यय फलटणकरांना दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सांयकाळी आला. शहरातील रिंग रोड वरून जाताना, डीएड कॉलेज चौक येथे ऊसाने भरलेली ट्रॉली, लॉक तुटल्याने ट्रॅक्टर पासून वेगळी झाली, व उतारामुळे वेगाने पाठीमागे येऊन रस्त्याच्या डिव्हायडर व लाईट पोलला धडकली, मात्र कोणताही अनर्थ झाला नाही. परंतु ट्रॉलीच्या पाठीमागे जर वाहने असती तर मात्र नक्कीच अपघात घडून जीवितहानी झाली असती.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरल्यामुळे, या वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये, ऊस एकावर एक थर देत उंच भरला जातो, त्यामुळे रस्त्यांना असणाऱ्या चढ - उतार किंवा खड्ड्यांमध्ये या ट्रॉल्या पलटी होत असल्याचे दिसत आहे. ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॉलीत जर त्याच्या कॅपॅसिटी एवढाच ऊस भरला आणि आपली वाहने सुस्थितीत असल्याची खात्री केली तर हे अपघात टाळता येणार आहेत.
जे शेतकरी व ऊस वाहतूकदार, वाहनांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त ऊस भरतील किंवा आपली वाहने सुस्थितीत ठेवणार नाहीत तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर साखर कारखाने व पोलीस यंत्रणेने दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
No comments